सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी
तरुणांचा सहभाग वाढविणे आवश्यक - मुख्यमंत्री
            नागपूर, दि. 15 : भारतीय संविधानाने आपल्या देशात अत्यंत आदर्श अशी संसदीय प्रणाली निर्माण केली असून मागील काही काळात तरुण पिढी त्यापासून दुरावली आहे. भारतीय लोकशाहीला अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने तरुणांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढवून त्यामाध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
            राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनात 44 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या अभ्यासवर्गाचे उद्‌घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे,  आमदार प्रा. मेघा कुलकर्णी, सीपीएचे खजिनदार उल्हास पवार, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव
डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
            अभ्यासवर्गात राज्यातील 11 विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत.
            मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या संविधानाने लोकशाही प्रणालीतील सर्व स्तंभांचा एकमेकांवर अत्यंत आदर्श असा अंकुश ठेवला आहे. विधीमंडळात राज्याच्या विविध भाग आणि समाजातील लोकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे विधीमंडळाला राज्यातील प्रत्येक व्यक्तिचे प्रतिनिधीत्व लाभते. समाजातील शेवटच्या घटकाचे हीत साधण्याचे बहुमोल कार्य विधीमंडळामार्फत होते. विधीमंडळ हे लोकांना न्याय देण्याचे महत्वपूर्ण व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले.
            संविधानाने राज्याच्या अखत्यारीत दिलेल्या विविध विषयांसंदर्भात कायदे तयार करणे तसेच संपूर्ण राज्याचे वित्तीय व्यवस्थापन करणे हे विधीमंडळाचे प्रमुख कार्य असते. याशिवाय राज्यातील तातडीच्या समस्यांसंदर्भातही विधीमंडळात चर्चा करुन ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. विधीमंडळाचा जास्तीत जास्त वेळ हा विधेयकांवर सविस्तर चर्चा, विचारमंथन करुन राज्याला प्रभावी कायदे देण्यासाठी व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
            प्रास्ताविकपर भाषण करताना विधानपरिषदेचे सभापती श्री. देशमुख म्हणाले की, समाजातील उपेक्षीत, दुर्लक्षीत सामान्य माणूस हाच आपल्या विकास धोरणांचा केंद्रबिंदू असायला हवा. आजच्या तरुण पिढीने देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने या दुबळ्या घटकाच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्याला उभारी देण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
            विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले की, तरुण पिढीने स्वत:च्या विकासासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट असून राज्याला पुढे नेण्यासाठी पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानही तितकेच महत्वाचे असून तरुणांनी या प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रीत करुन राज्याच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे, असे ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार प्रा. मेघा कुलकर्णी यांनी केले. उपसभापती श्री. डावखरे यांनी आभार मानले.
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा