बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२


राज्याच्या गतिमान विकासासाठी  प्रशासनाचा
लोकाभिमुख दृष्टीकोन महत्वाचा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 29 : राज्याच्या गतिमान विकासासाठी शासन आणि प्रशासनाचा लोकाभिमुख दृष्टीकोन महत्वाचा असून सामान्य नागरिक केंद्र बिंदू मानून पारदर्शक प्रशासन राबविण्यावर भर द्यावा, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
आज मंत्रालयात राजपत्रित अधिकारी महासंघाचा 26 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्य मंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र धोंगडे, सरचिटणीस ग.दि. कुलथे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. 
प्रशासकीय वर्गाला दिल्या जाणाऱ्या वेतनश्रेणी निश्चितीच्या कामातील त्रुटी दूर केल्या जातील असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या सेवा काळात त्यांच्या कार्यसहभागाने प्रशासनाला गतिमान ठेवत असतात. त्यांचे हे महत्व पूर्ण योगदान लक्षात घेता, 80 ते 100 या वयोगटातील वयोवृध्द सेवानिवृत्त धारकांना वाढीव पेन्शन देण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक दृष्टीने विचार करेल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही प्रशासनाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एका व्यापक भूमिकेतून आपण सगळयांनी अधिक पारदर्शक व गतिमान कार्यपध्दतीचा स्वीकार केला पाहिजे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्याचा सर्वांगीण विकास साधताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्यात सर्वत्र काम करण्याची व्यापक मानसिकता जोपासली पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
जनतेच्या शासन प्रशासनाकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता शासकीय कामाकाजातील दिरंगाई  टाळून सामान्य माणसांचे प्रश्न तात्काळ सोडविणे आवश्यक आहे.  या सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने पारदर्शकरित्या काम करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी उत्तम कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वासुदेव भगत, जळगांव; विलास गावडे, कोकण भवन; शशिकांत घोरपडे, बांद्रा ; योगेश गोडसे, पुणे; दिलीप हळदे, कोकण भवन; जितेंद्र इंगळे, अमरावती; दिलीप जोखे, पुणे; विष्णू कांबळे, उस्मानाबाद ; डॉ. संपत खिलारी, कोल्हापूर ; डॉ. अशोक नांदापूरकर, ठाणे ; इंजि. के. पी. पाटील, अंधेरी ; श्री. श्रीकांत पाटील, मंत्रालय; 
डॉ. उज्ज्वला अविनाश पाटील, बुलढाणा
; डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, मंत्रालय ; डॉ. प्रमोद रक्षमवार, नागपूर ; आर.सी. शहा, ठाणे; साहेबराव साळुंखे, ठाणे; इंजि. अरुण सरागे, यवतमाळ ;  श्रीमती नसीमा मकसुद शेख, मंत्रालय ; बाबासाहेब शिंदे, अहमदनगर; रवींद्र शिंदे, ठाणे ; इंजि. सितल चंद्रशेखर सेवतकर, पुणे ; विलास ठाकूर, अमरावती ; श्रीमती सरोज दत्तात्रय थोरात- महाबोले, नाशिक ; डॉ. श्रीकांत तोडकर, मुंबई; बी.एम. टोपे, पुणे ; मोहन वर्दे, मुंबई यांना गौरविण्यात आले तर संस्थापक व उत्तम सल्लागार कार्यकर्ते बी.डी. शिंदे, वरिष्ठ अपर जिल्हाधिकारी, बि.गो. चिकोडे, सहाय्यक कामगार आयुक्त यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
0 0 0 0 0




माध्यमांच्या ताकदीचा वापर
जबाबदारीने व्हावा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 29: आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिडीयाची ताकद वाढली आहे. या ताकदीचा वापर जबाबदारीने केल्यास समाजाचे हित नक्कीच साधले जाईल. त्यादृष्टीने मिडीयाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली.
          मंत्रालयातील नुतनीकरण केलेल्या पत्रकार कक्षाचे उद् घाटन मुख्यमंत्री श्री.चव्हाण व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास श्री. पवार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कार्यवाह संजीव शिवडेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, मंत्रालयात असलेल्या सहाव्या मजल्याइतकेच तळ मजल्यालाही महत्व आहे. कारण शासनाने घेतलेले लोकोपयोगी निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात. हल्लीच्या आधुनिक युगात माध्यमांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्याने काही सेकंदात बातमी झळकते. त्यामुळे समाजात मिडीयाचे महत्व वाढले आहे. इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानामुळे तर माध्यमांची ताकद कमालीची वाढली आहे. या ताकदीचा वापर समाजहितासाठी जबाबदारपणे केला जावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन नेहमीच सहनुभूतीपुर्वक विचार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          उपमुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिकीकरणामुळे कामाला गती येते. पत्रकारांना आधुनिक सोयी मिळाल्यास शासनाचे विविध लोकोपयोगी निर्णय बातमीच्या स्वरुपात नागरिकांपर्यंत पोहोचविणे सुलभ होते. मंत्रालयातील पत्रकार कक्षाचे नुतनीकरण झाले त्याचप्रमाणे अन्य विभागांचेही अशाचप्रकारे नुतनीकरण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. गांगण यांनी प्रास्ताविक केले. संघाचे माजी अध्यक्ष अनिकेत जोशी यांच्या हस्ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. माहिती महासंचालक प्रमोद नलावडे यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार कक्षाच्या नुतनीकरणासाठी सहाय्य केलेल्या वास्तुविशारद अनंत गाडगीळ, अश्विनी देशपांडे, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे प्रा. साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे देविदास मुळे, माहिती व जनसंपर्कचे कर्मचारी सुनील खाडे, कंत्राटदार तेजस आशर यांचा  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमास पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. संजीवशिवडेकर यांनी आभार मानले.
00000000



मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२


केंद्र शासनाशी संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा
राज्यातील सर्व संसद सदस्यांनी करावा
           -मुख्यमंत्री

मुबई दि. 28 - कृषीमाल निर्यातीवरील बंदीमुळे कृषीक्षेत्रावर होणारे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे, साखर उद्योगावरील नियंत्रण उठवावे, नागपू या उपराजधानीच्या ठिकाणी मेट्रो रेल्वे सुरु करावी, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत वाढीवनिधी मिळवावा, यासारख्या केंद्र शासनाशी संबंधित प्रश्नांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेचा पाठपुरावा राज्यातील सर्व संसद सदस्यांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याच्या विकासाचे सर्व ‍प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिल्लीदरबारी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही उपस्थित खासदारांनी दिली.
 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहयाद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय उर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री राजीव शुक्ला, उपमुख्यमंत्री अजित पवार, 35 खासदार आणि मंत्रीमंडळातील सदस्य, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे 4 तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांबाबत खासदारांनी प्रदीर्घ चर्चा केली.

           किनारा नियंत्रण नियमावली क्षेत्राबाबत जानेवारी 2011 मध्ये प्रसिध्द झालेल्या अधिसुचनेत काही बदल सुचवण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विकासाच्या ज्या योजना राबविल्या जात आहेत, त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नियक्त करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
राष्ट्री वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असलेल्या इंडिया युनायटेड मिल क्र.2 (इंदु मिल) या गिरणीची संपूर्ण साडेबारा एकर जम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या भव्य स्मारकासाठी विना मोबदला राज्य शासनास हस्तांतरीत करण्याची विनंती पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना केली आहे. या स्मारकाचे बांधकाम करण्याकरीता जागा वापरण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. हे क्षेत्र सी. आर. झेडमुळे बाधित होत आहे, याबाबतही आपल्याला केंद्र शासनाच्या पर्यावरण वने मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
          नागप हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे महत्वाचे शहर आहे. मिहान प्रकल्पामुळे या शहराचे महत्व वाढले आहे. दिवर्सेदिवस शहराचे होणारे औद्योगिकीकरण आणि नागरीकीकरण लक्षात घेता या शहरात मेट्रो रेल्वेचा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे ऑक्टोबर 2012 अखेर याचा प्रारुप आराखडा तयार हो, असे स्पष्ट करुन नागप हे देशाचे टायगर कॅपिटल असल्याने पर्यटनाच्य दृष्टीने या भागाच्या विकासासाठी अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रेल्वेच्या सुरु असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात केंद्रिय रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधुन बैठक घेण्याबाबत इच्छा प्रदर्शित केली. या बैठकीमुळे राज्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाला चालना मिळेल. ही बैठक येत्या 2 मार्च रोजी मुंबईत घेण्याबाबत केंद्रिय रेल्वे मंत्रालयाने कळविले आहे.
राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. नाशिक - पुणे रेल्वे मार्गाच्या कामाला गती, कोकण रेल्वे मार्ग कोल्हापूरशी जोडण्याबाबत सर्वेक्षण, शिर्डी विमानतळाचे काम आणि राजीव गांधी आवास योजनेखाली निवडलेल्या गावांबाबतच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यानी या बैठकीत दिली. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेली तेरा विधेयके  केंद्राकडे प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचा शुभारंभ मुंबईत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 12 मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व संसद सदस्यांना दिले. कापूस, सोयाबिन, धान  उत्पादकांना राज्यशासनाने 2 हजार कोटीचे अर्थसहाय्य दिले आहे. कोरडवाहू जमिनीसाठी 5 वर्षांची महत्वाकांक्षी योजना, शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, गृहनिर्माण नियामक, प्राधिकरणाची  स्थापना, सर्व उपक्रमांना सामुहिक प्रोत्साहन योजना, नवीन वस्त्रोद्योग धोरण, मुद्रांक शुल्काचा इ-पेमेंटद्वारे भरणा, धारावी प्रकल्पास चालना मिळण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल, लॉटरी पध्दतीने गिरणी कामगारांना घरे, सीमावर्ती भागात 101 मराठी शाळा, महाराष्ट्र सदनात संसद सदस्यांसाठी विशेष कक्षाची स्थापना इत्यादी महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यानी या बैठकीत दिली.                                                000000