शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२


इंदर कुमार गुजराल यांच्या निधनाने
देशाने एक खंबीर नेतृत्व गमावले
                                         -- मुख्यमंत्री
       मुंबई, दि. 30 : माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या निधनाने राजकारणातील एक स्वाभिमानी आणि खंबीर नेतृत्व देशाने गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
          आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय राजकारणातील खंबीर आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्वामध्ये गुजराल यांचा समावेश प्रामुख्याने करावा लागेल. देशाचे पंतप्रधान पद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली आणि अतिशय कमी कालावधी लाभला असला तरी त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप राजकारण आणि प्रशासनावर टाकली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते डॉ.मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सत्तेच्या राजकारणातील सर्व चढउतारांना त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि राजकीय परिपक्वतेचा उपयोग वेळोवेळी सर्वांना होत होता. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास तसेच विविध विषयांवर सखोल विचार करण्याची त्यांची क्षमता पाहता असा कुशल नेता गमावल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
          गुजराल यांना देशातील सर्व पक्षांमध्ये आदराचे स्थान होते. त्यांच्या अभ्यासू व प्रभावी व्यक्तिमत्वामुळे सर्व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मला देखिल दिल्लीत असतांना त्यांचे काम जवळून पाहण्याची त्याचप्रमाणे देशासमोरील विविध प्रश्नांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली होती. गुजराल यांच्या रुपाने एक स्पष्टवक्ता, राष्ट्रप्रेमी आणि भविष्यातील वाटचालीची दृष्टी असलेला प्रभावी नेता आपल्यातून गेला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
सिंचनाची श्वेतपत्रिका जलसंपदा विभागाच्या
www.mahawrd.org या संकेतस्थळावर उपलब्ध  करण्यात आली आहे.
सिंचनाची श्वेतपत्रिका राज्य मंत्रिमंडळासमोर सादर झाली. त्यानंतर सह्याद्री राज्य अतिथीगृहावर प्रसारमाध्यमांशी बातचित करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे व अन्य मान्यवर.... (छाया : योगेश तांदळे, माहिती व जनसंपर्क विभाग)



बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

महात्मा फुले सामाजिक सुधारणांचे जनक- राज्यपाल
पुणे विद्यापीठात पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण

पुणे, दि. 28 : महात्मा फुले सामाजिक सुधारणांचे जनक असून त्यांच्या प्रेरणतून महिलांच्या शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घालण्यात आला आहे.  स्वयंरोजगार शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण होऊ शकेल, असे विचार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले.
            अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पुणे विद्यापीठास अर्पण करण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण पुणे विद्यापीठात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आज करण्यात आले.  तेंव्हा ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते.  सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री सचिन अहिर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
            पुणे शहर महात्मा फुले यांची कर्मभूमी असून येथील विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारला जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले 'महात्मा फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणा करताना अतोनात धारिष्ट्य दाखविले आहे.  महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना नवीन दिशा देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले असून छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या  कर्त्या समाजसुधारकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे.  स्त्रीशिक्षण, प्रौढ शिक्षण, विधवा विवाह आणि बालहत्या प्रतिबंधक क्षेत्रात त्यांनी केलेले काम क्रांतीकारी स्वरूपाचे आहे.  त्यांच्या विचारामुळे आज देशाने स्त्री शिक्षण, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था 50 टक्के आरक्षण आदी उल्लेखनीय काम केले आहे.  परंतु भ्रूणहत्या, हुंडाबंदी सारख्या अशा क्रूरप्रथा समाजात सुरू असून ही दुर्देवाची खेदाची बाब आहे.  महात्मा फुले यांचे या संदर्भातील विचार अंमलात आणल्यास या प्रथांना पायबंद बसू शकेल.  शिक्षण आणि स्वयंरोजगारामुळेच स्त्रीयांचे सबलीकरण होऊ शकेल.
            शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारावे विषय महात्मा फुले यांचा जिव्हाळयाचा विषय होता, असे सांगून राज्यपाल म्हणाले, 'कमी क्षेत्रफळात शेतीचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविणे हे शेतकऱ्यांपुढील आजचे आव्हान आहे.  कृषीविद्यापीठ, उद्योजक शेतकरी यांच्यात समन्वय घेऊन शेती किफायतशीर कशी होईल या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.  भारतीय बाजार पेठेत थेट परदेशी गुंतवणूकीमुळे कृषि क्षेत्राला काय लाभ मिळू शकेल या बाबत कृषीविद्यापीठाने जागृती करण्याची गरज आहे.
            समाजातील वंचित घटकांना महिलांना शिक्षण देण्याचे क्रांतीकारी कार्य महात्मा फुले यांनी पुण्यातून सुरू केले आहे.  याच विद्यापीठात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे ही बाब औचित्याला धरून असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.   ते म्हणाले, महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकात जे द्रष्टे महापुरूष होऊन गेले त्यात महात्मा फुले यांचे स्थान अग्रणी आहे.  सामाजिक समता स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजच्या परिस्थितीतही प्रेरक आहे.  स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे.  ज्योतिराव फुले यांनी 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथात व्यक्त केलेले विचार त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष आहेत'.
            महात्मा फुले यांनी शिक्षणाची कास धरून खऱ्या अर्थाने समाजातील दीन-दलि स्त्रीया यांच्यापर्यंत ज्ञान नेण्याचे बहुमोल कार्य केले असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.  ते म्हणाले, प्रत्येकाला शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता.  त्याला आज व्यापक स्वरूपात प्रतिसाद मिळाला आहे.  सामाजिक कार्याची महात्मा फुल्यांपासून प्रेरणा घेणाऱ्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा समता परिषदेतर्फे पुणे विद्यापीठात उभारण्यासाठी देण्यात येईल.
            कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी प्रास्ताविक केले.  महात्मा फुले यांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार बालकृष्ण पांचाळ यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रभारी कुलसचिव डॉ. चंद्रशेखर चितळे यांनी आभार मानले.
000000

 राष्ट्रीय सुरक्षितेत नुष्य बळ विकासासाठी एनडीएचे मोठे  योगदान - मुख्यमंत्री
पुणे, दि. 28 : राष्ट्राची सुरक्षा आणि विकासाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एन.डी.ए.) मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 123 व्या दीक्षांत समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे कमांडट लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, प्राचार्य ओ.पी.शुक्ला, रिअर डमिरल आनंद अय्यर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, देशाची आजपर्यंतची वाटचाल दोन टप्प्यात झाली आहे. नव्वदच्या दशकापर्यंत देशाची अर्थव्यवस्था बंदीस्त होती. पण त्यानंतर अर्थव्यवस्था खुली झाली. त्यामुळे देश आर्थिक आघडीवर अधिक गतीने विकास करू लागला. पण त्याचबरोबर देशाला अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन आघाड्यांवर आपली सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली आहे. देशाची सुरक्षा चोख ठेवण्याचे कार्य आपले लष्कर करीत आहे. लष्करासाठी अतिशय चांगले अधिकारी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी करीत आली आहे, यापुढेही करीत राहील. प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे याचा राज्य शासनाला विशेष अभिमान आहे. संरक्षण दलासाठी लागणाऱ्या विविध उत्पादनांबाबत नवीन खरेदी धोरण आखले आहे. यामुळे देशातील खासगी उत्पादकांना नवीन संधी निर्माण होतील.
एनडीएमध्ये मिळालेल्या शिक्षणाचा संरक्षण दलाच्या सेवेत तर उपयोग होणारच आहे पण त्याचबरोबर  येथे मिळालेले सेवा, शिस्त, शिक्षण आणि देशप्रेमाची शिकवणीचा जीवनभरात उपयुक्त ठरतील, देशाची सेवा आणि विकास यासाठी कार्यरत राहा, असा संदेशही मुख्यमंत्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आज सुमारे 330 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भोजराज शाक्या याला नेव्हल स्टाफ करंडकाने गौरविण्यात आले. त्याचबरोबर ए.एस. भट्ट, पी. सिंग यांनाही विशेष नैपुण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. लेफ्टनंट जनरल अशोकसिंग यांनी प्रास्ताविक तर रिअर डमिरल आनंद अय्यर यांनी आभार मानले.
000