मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

अमेरिकेच्या उद्योगांनी दाखविले गुंतवणुकीत स्वारस्य
गतिमान निर्णयप्रक्रीयेबरोबरच  ‘उद्योगस्नेही वातावरणा’ची
दिली मुख्यमंत्र्यांनी ग्वाही : चर्चेत 22 उद्योजक सहभागी

नागपूर, दि. 16 : महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रक्रीया आणि ‘उद्योगस्नेही वातावरणा’ची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील 22 प्रमुख उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींनी आज श्री. फडणवीस यांची ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व सुविधायुक्त ‘मिहान’मध्ये आणि महाराष्ट्रात कोठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चेला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव (साप्रवि) पी. एस. मीना, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) सुमित मलिक, अपर मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव (उद्योग) अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावित
यावेळी उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा आपला अनुभव अतिशय समाधानकारक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच
‘मेक इन महाराष्ट्र’ संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे निर्णय घेतले, त्याबद्दल समाधान व्यक्त करुन आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यात आता अधिक स्वारस्य निर्माण झाल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे अमेरिकेबरोबरच सर्व जगातील गुंतवणुकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. रस्ते, रेल्वे, हवाई, बंदरे अशा सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा महाराष्ट्रात आहेत. मात्र उद्योग सुरु करताना ज्या विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, त्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्र्यांचा समावेश असलेली एक आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरी अशी दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या व असलेल्या उद्योगांचा विस्तार करणाऱ्या सर्व उद्योगांचे आम्ही मनापासुन स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी सुकांती घोष,आशिष दुबे (APCO), मोहित बन्सल ( AMAZON), वरुण खन्ना (BECTON), प्रत्युष कुमार (BOEING), प्रसाद शिवलकर (HINDUSTAN COCA-COLA), निकेत घाटे (COLGATE), रुस्तुम देसाई (CORNING), राजीव सिंग (DATACARD), विशाल वर्मा (EDGEWOOD), पी. बालेंद्रन ( GENERAL MOTORS), वरुण जैन (HONEYWELL), अनुप कुमार मेहरोत्रा, सुनिल नाईक, व्ही.व्ही. नाईक (JABIL CIRCUIT),  जावेद अहमद (CATERPILLAR), महेश कृष्णमूर्ती (RGP), गिरीधरन अय्यर (VARIAN MEDICAL), क्रिश अय्यर, रजनीश कुमार (WAL-MART), अजय सिंघा, सुरभी वाहेल (AMCHM) आदी उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा