शनिवार, १९ मे, २०१२


प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या निधनाने
सच्चा समाजवादी हरपला : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 19 : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या निधनाने एक सच्चा समाजवादी कार्यकर्ता हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
        मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, साने गुरुजींचे सहकारी असलेल्या प्रकाशभाईंनी त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार राज्यभर केला आणि महाराष्ट्रात साने गुरुजींचे विचार रुजविण्याचे मोलाचे कार्य केले. मुंबईचा समाजवादी चेहरा अशी त्यांची ओळख होती. साने गुरुजींच्या सहवासात त्यांच्याकडून मिळालेले संस्कार हा प्रकाशभाईंच्या आयुष्यातील अमूल्य ठेवा होता. हा ठेवा त्यांनी आयुष्यभर जपला आणि इतरांनाही तो दिला. शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी  विधान परिषदेत अनेक प्रश्न तळमळीने मांडले. त्यांच्या निधनाने गांधीवादी आणि समाजवादी विचारसरणीचा सच्चा पुरस्कर्ता हरपला आहे.

                                        0000000



एव्हरेस्ट विजयी गिर्यारोहक युवकांनी
महाराष्ट्राचे नाव उंचावले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19 : पृथ्वीवरील सर्वोच्च असे हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे या वर्षीच्या मोहिमेतील पहिले गिर्यारोहक महाराष्ट्रातील आहेत ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या युवकांनी महाराष्ट्राचे नाव आणखी उंचावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहक युवकांचे अभिनंदन केले आहे.
        सागरमाथा आणि गिरीप्रेमी या संस्थांचे सहा गिर्यारोहक अनेक अडचणींना सामोरे जात एव्हरेस्ट शिखरावर पोहचले. विशेष म्हणजे संपूर्णपणे नागरी स्वरुपाची असलेल्या या मोहिमेसाठी सर्वात कमी खर्च आला. या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी ही पहिली भारतीय तुकडी आहे, याचा महाराष्ट्राला तसेच देशाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
        या मोहिमेमुळे एव्हरेस्टसारखे जगातील उत्तुंग शिखर काबीज करण्याच्या अनेक मोहिमांना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे या गिर्यारोहकांची यशोगाथा आणि त्यांचे अनुभव गिर्यारोहणाला व इतर धाडसी क्रीडाप्रकारांना उत्तम संधी मिळवून देतील, यात मला शंका वाटत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
        1998 मध्ये महाराष्ट्राच्या सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते.  राज्याच्या गिर्यारोहकांनी चौदा वर्षानंतर परत एकदा हा बहुमान मिळवला आहे.

                                        0000000000

शुक्रवार, १८ मे, २०१२


भारतीय प्रशासन सेवेप्रमाणे
राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार
                                           - मुख्यमंत्री
        पुणे, दि .18 : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत प्रशिक्षणाच्या धर्तीवर स्टेट कॅडरच्या अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात  येईल,अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  दिली.
        पुण्याच्या 'यशदा' येथील एम.डी.सी. सभागृहात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचा समारोप मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, तेंव्हा ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, अपर मुख्य सचिव (महसूल) स्वाधीन क्षेत्रिय, यशदाचे महासंचालक संजय चहांदे, माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
        सर्व सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्टेट केंडरच्या अधिकाऱ्यांना उच्च प्रतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाच्या अध्यक्षांनी हे उपक्रम  सुरु करावे. स्टेट कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या सेवा-शर्थी बाबत आढावा घेतला जाईल. नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यातील शासकीय इमारतींचे बांधकाम करणे, रिक्तपदे भरण्याबाबत महसूल विभागाने धडक कार्यक्रम हाती घ्यावा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जलद पारदर्शक पध्दतीने अकृषिक परवाना देणे, शासकीय जमिनीची डाटा बँक तयार करणे, जमिनीचे फेर सर्व्हेक्षणाबाबत पथदर्शी प्रकल्प राबविणे आदी उपक्रम सर्वत्र राबविले जाईल. बदलत्या काळात महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी संगणकीकरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही काळाची गरज आहे. चालू वर्षात महसूल विभागाने संकल्पीत केलेल्या राजस्व अभियानामध्ये ई-चावडी, ई-मोजणी, ऑनलाईन फेर फार या स्वरुपात साध्य होणार आहे, ही आनंदाची बाब आहे.
        दुर्गम भागात चांगले अधिकारी जावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार महसूलदिनी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
        महसूल उपविभागाच्या पुनर्रचनेबाबतच्या प्रस्तावना राज्य शासन लवकरच मंजूरी देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेत टेवलेल्या निधीचा वापर प्रशासनाच्या सोयीसाठी करावा.  सार्वजनिक हितासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचा पाठीशी शासन खंबीरपणे राहतील महसूल विभागाच्या विकासासाठी निधीची अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
        महसूल प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमूख करण्यात येणार असल्याचे  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना सांगिले.
        महसूल राज्यमंत्री, प्रकाश सोळंके यांचे भाषण झाले. अपर मुख्यसचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी प्रास्ताविक केले. पुण्याचे विभागयी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आभार मानले.
 0 0 0 0 0  0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आधार नोंदणीच्या
दुसऱ्या टप्प्याचा पुणे शुभारंभ

        पुणे, दि .18 : महाराष्ट्र शासन आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने  आधार प्रयोगिक तत्वावर नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे  येथे झाला.
        यशदा च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूलराज्यमंत्री प्रकाश सोळंके, आधार योजनेचे उपमहासंचालक अजय भूषण पांडे, माहिती-तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अपर मुख्यसचिव स्वाधीन क्षत्रिय हे उपस्थित होते.
        आधार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रत 4 कोटी नोंदणी करुन देशभरात प्रथम आल्याबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की,  दुसऱ्या टप्प्यात 7 कोटी लोकांची नोदंणी 31 मार्च 2013 पर्यंत करायची आहे. या प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
0  0 0 0 0 0
                                                                               
मराठी भाषा संगणक उत्कृष्टता केंद्राचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
        पुणे, दि. 18 : माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍ़डव्हान्सड् कंप्युटिंग (सी-डॅक पुणे) यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या मराठी भाषा संगणक उत्कृष्टता केंद्राचा शुभांरभ पुणे येथे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
        याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, अपर मुख्यसचिव (महसूल) स्वाधीन क्षत्रिय, माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मुना यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मराठी भाषा संगणकाच्या उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडे होता. त्या दृष्टीने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्र संगणकात टंकलेखन करण्याविषयीची मानके, साठवणूकीची मानके, फाँटची मानके अशा मूलभूत मानकां संदर्भात माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला मदत करेल. त्याशिवाय वर्ल्ड वाईट वेब कंसोर्टियस, युनिकोड, आयर्केन अशा आंतरराष्ट्रीय सहकार्य गटांमध्ये इतर स्थानीकीकरण तसेच प्रमाणीकरण मंडळामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी मदत करेल. यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान  मिळेल. या उपक्रमामुळे विविध प्लॅटफॉर्मस् मल्टी मोडल डिव्हाईसेसना मराठी मध्ये सहज काम करता येईल.
 सीडॅक चे सहसंचालक महेश कुलकर्णी यांनी या केंद्रातर्फे आगामीकाळात राबविण्यात येणाऱ्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
 0 0 0 0 0 0