बुधवार, १७ डिसेंबर, २०१४

मा मुख्यमंत्री यांचे विधानसभेतील निवेदन
दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय चमूशी भेट

श्री. प्रवेश शर्मा, अतिरिक्त सचिव, भारत सरकार ह्यांचे नेतृत्वाखालील केंद्रीय चमूशी आज दुपारी १२.३० वाजता मी सविस्तर चर्चा केली.  ह्या चमूने गेले २ दिवस सर्व दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील जवळपास निम्मी गावे दुष्काळाच्या विपरीत प्रभावाखाली आहेत व २०१२ च्या दुष्काळापेक्षाही ही स्थिती गंभीर आहे ह्याचा अंदाज पाहणीनंतर केंद्रीय चमूला आला आहे. २०१२ पेक्षा दुप्पटीने जास्त गावे ह्यावेळी बाधित झाली आहेत ही जाणीव चर्चेदरम्यान मी करुन दिली. परिस्थिती भीषण असताना देखील दुष्काळी स्थितीला शासन यंत्रणेमार्फत दिल्या जात असलेल्या प्रतिसादाचे त्यांनी कौतुक केले. राज्य शासनामार्फत मेमोरँडम पाठवून केंद्रीय मदतीविषयी आपण अगोदरच मागणी केली आहे. त्यामध्ये १९००० गावांचा समावेश असून रु. ३९२५ कोटी इतकी मागणी आपण केलेली आहे. चर्चेदरम्यान काही महत्वाचे मुद्दे आले :-
१)    अंतिम पैसेवारीनंतर गावांची संख्या (सुमारे ५७०० ने) वाढण्याची शक्यता बरीच आहे. त्या सर्व गावांचा समावेश अंतिम अहवालात करण्यात येईल. असा समावेश करुन सुधारित मेमोरँडम पाठवल्यानंतर High Level Committee च्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. सर्व गावांचा समावेश केल्यानंतर मदत अधिक भरीव होईल.
२)सध्या मागणी केलेल्या रक्कमेमध्ये निव्वळ शेतीच्या नुकसानीचा अंतर्भाव आहे. पण भविष्यात चारा टंचाई, पाणी टंचाई ह्यासाठी अधिक रक्कम लागल्यास त्याचाही विचार केंद्र शासनामार्फत करण्यात येईल. धान्याची गरज भासल्यास अतिरिक्त धान्य किफायतशीर दरात उपलब्ध करुन देणे शक्य असल्याचेही केंद्रीय चमूने सांगितले. ह्या बाबींसाठी आवश्यकतेनुसार सुधारित मेमोरँडम पाठवण्याचे ठरले.
दौऱ्यादरम्यान राज्यातील स्थितीची गंभीर स्थिती केंद्रीय चमूसमोर अधोरेखित झाली व केंद्र शासनाला सादर होणाऱ्या अहवालात, अधिकाधिक मदत मिळण्याचे दृष्टीने शिफारस करण्याची हमी समिती प्रमुखांनी दिली. मेमोरँडम प्राप्त झाल्यावर त्वरेने राज्यास भेट देऊन तपशीलवार पाहणी केल्याबद्दल मी समिती सदस्यांना धन्यवाद दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा