मंगळवार, ९ डिसेंबर, २०१४

 टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी
वातावरणातील बदलानुसार शेतीचे नियोजन
·        देवेंद्र फडणवीस
सुयोगला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद
नागपूर, दि. 9 :  राज्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने पथक पाठविले असून मदतही लवकरच मिळेल. परंतु राज्यातील परिस्थितीवर  कायम स्वरुपी मात करण्यासाठी वातावरणातील बदलाचा शेतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करुन शेतीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
   विधिमंडळाच्या वृत्तसंकलनासाठी आलेल्या सुयोग या पत्रकारांच्या निवासी शिबिरास मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी माध्यम  प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करतांना  ते बोलत होते. यावेळी  सुयोग निवास शिबिर प्रमुख राजन पारकर,  विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रवीण पुरो, माहिती व जनसपंर्क सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, माहिती व जनसंपर्क महासंचालक चंद्रशेखर ओक यावेळी उपस्थित होते.
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने सुयोग या पत्रकारांच्या निवासी शिबिराला पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सुयोगला भेट दिली. आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात तसेच राज्यातील टंचाई परिस्थितीवरील उपाययोजना, केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची सद्य:स्थितीत आणि त्यावर सुरु असलेल्या राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींनीसोबत  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात  राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा  कशी असेल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
राज्यासमोर अनेक आव्हानासोबतच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचे आव्हान आहे. राज्यात 19हजार गावांमध्ये टंचाई परिस्थिती असून यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न असला तरी पावसाळयापर्यंत चारा उपलब्ध आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नियमित टँकर सुरु आहेत ते सुरु राहतील. तसेच जिथे आवश्यकतेनुसार प्राप्त वाढ करण्यात येईल.
राज्यातील शेतीच्या नियोजनासंदर्भात तसेच टंचाई परिस्थिती संदर्भात उत्पादकता वाढविणे तसेच सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्यप्रदेश मॉडेलनुसार नियोजन करण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, लघु सिंचन प्रकल्प, कोल्हापुरी साखळी बंधारे आदी उपाययोजना करुन सिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या जलसंधारण बंधाऱ्यांवर होणारा खर्च आणि त्यापासून उपलब्ध सिंचन क्षमता याचा समन्वय असावा, यासाठी डिजिटल छायाचित्रणाद्वारे नियंत्रण व नियोजन ठेवण्यात येणार आहे.
राज्यात विकासाचा समतोल साधतांना विदर्भ आणि मराठवाडा या भागात सिंचन क्षमता वाढविण्याची आवश्यकता असून पाण्याचे नियोजन करतांना तुषार व ठिबक सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.  विजेवरील अनुदान तसेच उद्योगांना परवडेल असे विजेचे दर निश्चित करुन राज्यात गुंतवणूक वाढविण्यावर विशेष प्रयत्न सुरु असून शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील 5 लक्ष कृषीपंप देण्यात येणार असल्यामुळे कृषी उत्पादनाच्या वाढीला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा विकास, मिहान प्रकल्प तसेच नवी मुंबई येथील विमानतळ आदी प्रश्नासंदर्भातही माध्यम प्रतिनिधीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. प्रारंभी शिबिर प्रमुख राजन पारकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
*****

सुयोग येथे अद्ययावत माध्यम केंद्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
                नागपूर, दि. 9 :  विधिमंडळ अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना सुयोग येथे  इंटरनेट व वायफायची सुविधा असलेल्या माध्यम केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी  येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना  इंटरनेट संगणक व वायफाय आदी अद्ययावत सुविधायुक्त माध्यम कक्ष सुयोग येथे प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. माध्यम केंद्रामुळे वृत्तपत्रप्रतिनिधींना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने  माध्यम कक्ष सुरु करण्यात आले आहे.
सुयोग येथे पत्रकार निवास शिबिरामध्ये सुरु करण्यात आलेल्या माध्यम केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यम केंद्र उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली.
 माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालक चंद्रशेखर ओक, शिबिर निवासी  प्रमुख राजन पारकर, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रवीण पुरो, संचालक शिवाजी मानकर, मोहन राठोड तसेच वरिष्ठ पत्रकार व अधिकारी  उपस्थित होते.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा