शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे
भव्य स्मारक  इंदू मिलच्या जागेवर उभारणार
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची घोषणा

मुंबई, दि. ५ : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक महाराष्ट्र राज्य सरकारशी सल्लामसलत करुन दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येईल, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
        या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबईतील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार याठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानास साजेल, असे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा तपशील राज्य सरकारशी सल्लामसलत करुन ठरविण्यात येत आहे. याविषयीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता विनाविलंब करण्यास सरकार बांधील आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान
        केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या आनंददायक वृत्तामुळे स्मारक उभारणीच्या कार्याला आता मोठी गती येणार आहे. हे स्मारक भव्य होईल आणि प्रत्येकाला डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा देणारे असेल, याची दक्षता घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा