बुधवार, १० डिसेंबर, २०१४

चंद्रकांत खोत हे इहवाद आणि परमार्थ याचा
अनोखा मेळ साधणारे कलंदर साहित्यिक : मुख्यमंत्री
 नागपूर, दि. 10: बोल्ड आणि बिनधास्त लेखनाबरोबरच अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक लेखन करणारे चंद्रकांत खोत हे इहवाद आणि परमार्थ याचा अनोखा मेळ साधणारे कलंदर साहित्यिक होते. त्यांच्या निधनामुळे एका बंडखोर आणि पारदर्शक व्यक्तिमत्वाच्या साहित्यिकाला मराठी साहित्यविश्व मुकले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की, 'अबकडई'  या अतिशय दर्जेदार दिवाळी अंकाच्या माध्यमातून चंद्रकांत खोत यांनी अनेक दशके मराठी वाचकांवर मोहिनी घातली होती. ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त, ' विषयांतर' या बोल्ड कांदबऱ्यांनी त्यांनी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिली. त्याचबरोबर त्यांनी पुढे आध्यात्मिक क्षेत्राकडे वळुन जे लेखन केले, त्यामुळेही  रसिक आश्चर्यचकित झाले. वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी खोत यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. स्वामी रामकृष्ण परमहंस-शारदादेवी यांचा जीवनपट मांडणारे 'दोन डोळे शेजारी ', स्वामी विवेकानंदांवरील 'संन्याशाची सावली' व ‘बिंब प्रतिबिंब’, साईबाबांवरील 'अनाथांचा नाथ' या त्यांच्या आध्यात्मिक कादंबऱ्या पुष्कळ गाजल्या. 1995 नंतर अचानक दहा-पंधरा वर्ष ते अज्ञातवासात गेले होते. खोतांचे एकंदर आयुष्यच एखाद्या चमत्कृतीपूर्ण कादंबरीसारखे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा