मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे
उभे राहिल, संकटातून निश्चितच मार्ग काढू
मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. 2 : राज्यात, विशेषत: मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे आपण व्यथित झालो असुन दुष्काळाच्या समस्येतून आम्ही निश्चितच मार्ग काढू. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी काही उपाय आम्ही आधीच जाहीर केले आहेत. त्यात भर घालू, पण शेतकरीबंधुंनी धीर सोडू नये. सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे भावपूर्ण आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
        श्री. फडणवीस आपल्या आवाहनात म्हणतात की, राज्यासमोरील दुष्काळाचे संकट अभूतपूर्व आहे. मात्र निसर्गाच्या या प्रकोपावर मार्ग काढण्याचा आणि शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा आमचा निर्धार ठाम आहे. मी वैयक्तिकपणे आणि मंत्रिमंडळ स्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहे. नुकसानीचे पंचनामे न करताच निधीसाठी प्रतिवेदन पाठविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्राकडे साडेचार हजार कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र तूर्तास शेतकऱ्यांनी अडचणींना घाबरुन धीर सोडु नये, सरकार सर्वतोपरी त्यांच्यासोबत राहील. काल दिवसभरात तसेच, गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपविण्याच्या ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
        दुष्काळ आणि पिकाच्या नुकसानीमुळे सर्वस्व गमावलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने विजबिलामध्ये सवलत, दहावी-बारावीची परीक्षा फी माफ, शेतीकर्जाची फेररचना, कर्जवसुलीला स्थगिती असे तातडीचे उपाय योजले आहेत. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी सरकारला साथ द्यावी, यातून आम्ही निश्चितच मार्ग काढू, असा आत्मविश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा