मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

बॅ. अंतुले हे अभ्यासू आणि आक्रमक नेते - मुख्यमंत्री
        मुंबई, दि. 2 : माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांच्या निधनाने एक अभ्यासू आणि आक्रमक नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
          आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बॅ. अंतुले हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले होते. जनमानसात त्यांची प्रतिमा लोकप्रिय मुख्यमंत्री अशी होती. त्यांनी प्रशासनालाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.  सामाजिक कार्यातून आपल्या वाटचालीची सुरुवात करणाऱ्या बॅ.अंतुले यांनी विशेषत: कोकणामधील समस्यांकडे लक्ष दिले आणि ते सोडविण्यासाठी पावले उचलली.  आपल्या तत्वावर ठाम राहून वेळप्रसंगी त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द संघर्ष केला, असेही मुख्यमंत्री म्हणतात.
-----0-----
देवेन वर्मा यांच्या निधनामुळे विनोदाचे अचूक टायमिंग
असलेला अभिनेता गमावला मुख्यमंत्री
मुंबई, दि. 2:  विनोदाचे अचूक टायमिंग आणि नेहमी हसतमुख राहून जगाला हसवता-हसवता नकळत भावूक करून टाकणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. 
विनोदाचे अचूक टायमिंग आणि सहज संवाद साधण्याच्या कौशल्यामुळ रसिकांना पोट धरून हसायला लावणारे देवेन वर्मा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अंगुर सिनेमातली त्यांनी साकारलेली दुहेरी भूमिका सिनेरसिकांच्या आजची स्मरणात आहे. कुठलाही अंगविक्षेप न करता निव्वळ संवादाच्या आधारे त्यांनी रसिकांना पुरेपुर हसवत अनेक पिढ्यांचे मनोरंजन केल आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी एका महान अभिनेत्याला मुकली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा