सोमवार, १ डिसेंबर, २०१४

बंदरे महामार्ग व रेल्वेला जोडण्याच्या कामासह
पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देणार : मुख्यमंत्री
जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा सामंजस्य करार
मुंबई, दि. १: कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांचा विकास करण्याला आमचे प्राधान्य राहील, याचाच एक भाग म्हणुन जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाचा सामंजस्य करार आज होत आहे. राज्याच्या दृष्टीने ही घटना खुप महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहावर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ आणि JSW जयगड पोर्ट लि. यांच्या दरम्यान जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पांविषयी सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव एस.के.शर्मा, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, खाजगीकरणातून बंदरांचा विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.  त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशिय बारमाही बंदर JSW जयगड पोर्ट लि. या खाजगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे.  याचा पहिला टप्पा पूर्वीच कार्यान्वित झाला असून प्रतिवर्षी सुमारे साडेसहा दशलक्ष टन माल या बंदरातून हाताळला जातो.  मात्र, या बंदराचा विकास अपेक्षित असून दरवर्षी 50 दशलक्ष टन इतकी माल हाताळणी क्षमता निर्माण करण्यात येत आहे.  अर्थातच यासाठी हे बंदर रेल्वेशी जोडणे अत्यावश्यक आहे. 
कोकण रेल्वे महामंडळाने जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा 38 कि.मी.चा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.  केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 34 किलोमीटर लांबीचा जयगड ते डिगणी या प्रस्तावित एकेरी मार्गाचा खर्च 775 कोटी रूपये आहे. हा प्रकल्प कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड आणि जयगड पोर्ट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सुमारे 30 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होऊन जयगड बंदर कोकण रेल्वेद्वारे संपूर्ण देशाशी जोडले जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रमुख बंदरांना राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बंदरातील मालाची चढउतार आणि आयात-निर्यातीत वाढ करावयाची असेल तर ही बंदरे अशा पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. हा प्रकल्प संयुक्त भागीदारीतून उभा राहणार असून खासगी भागीदार म्हणून जयगड पोर्ट लिमीटेडची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरीता 3:1 या प्रमाणात समभागाची 194 कोटी रूपयांची रक्कम उभी करण्यात येणार आहे. यापैकी कोकण रेल्वे 26 टक्के, मेरीटाईम बोर्ड 11 टक्के आणि जयगड पोर्ट 63 टक्के अशा पद्धतीने समभागांची उभारणी करण्यात येईल.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने या करारावर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, कोकण रेल्वेच्यावतीने पायाभूत सुविधा विभागाचे महाव्यवस्थापक टी. के. दिनेश कुमार आणि जयगड पोर्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.जे.के. शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
00000

शौर्यपदकधारकांच्या कुटुंबियांना विशेष सवलतीसाठी
 लवकरच धोरण ठरविणार : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1 : विविध शौर्यपदकप्राप्त शहिदांच्या कुटुंबियांना विशेष सवलती देण्यासाठी राज्य शासन लवकरच धोरण तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  दिली.  हे धोरण ठरविताना राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करावा आणि तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथे 26/11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करीत असतांना शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.  यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
विविध शौर्यपदक मिळालेल्या शहीदांच्या कुटुंबियांना अन्य राज्यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. अशाप्रकारे महाराष्ट्रातही ह्या सवलती मिळाव्यात, अशी मागणी शहीदांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नियमाप्रमाणे ज्या सवलती लागू आहेत, त्याव्यतिरीक्त विविध शौर्यपदक विजेत्या शहिदांच्या कुटुंबियांना अन्य राज्यांमध्ये यासंदर्भात जे धोरण आहे, त्याचा अभ्यास करून महाराष्ट्राचे धोरण ठरविण्यात येईल.
मुख्यमंत्री म्हणाले, शहिदांच्या वारसांना पेट्रोलपंप, सीएनजी, गॅस एजन्सी देण्यात आलेल्या आहेत.  तथापि, यासंदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण केंद्रीय मंत्र्यांशी या समस्या सोडविण्यासाठी चर्चा करू तसेच शहिदांच्या कुटुंबियांना पेट्रोलियम मंत्र्यांशी भेटण्याची व्यवस्था करून देवू , असेही त्यांनी सांगितले. शहिदांच्या कुटुंबियांनी आपल्या विविध अडचणींसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.  या अडचणींचे निराकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.   
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, श्रीमती साळसकर, मानसी शिंदे, प्रतिभा पाटील, कल्पना पवार, भोसले, मोरे, श्री.शिंदे, संतोष जाधव, नरेंद्र पाटील आदी कुटुंबिय उपस्थित होते.
------0------

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी
शासकीय मानवंदना देण्यात येणार मुख्यमंत्री
        मुंबई, दि. 24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन येत्या 6 डिसेंबर रोजी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानात करावयाच्या विविध उपाययोजना आणि पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक बोलावली होती. या बैठकीस सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना दिली जाईलच याशिवाय याठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने यावेळी मुख्यमंत्र्यांकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी जाहिरात प्रसिध्द करावी अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री महोदयांनी या दिवशी महासंचालनालयामार्फत जाहिरात देण्यात यावी अश्या सूचना दिल्या.
विविध विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था ठेवावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे महणाले की, चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा  पुरविण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. तसेच मध्य रेल्वे मार्फत 6 विशेष गाडया  आणि कोकण रेल्वेमार्फत 2 विशेष गाडया सोडण्यात येणार आहे. याचबरोबर मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत कुर्ला, ठाणे, कल्याण याबरोबरच वाशी,पनवेल येथे जाण्यास विशेष गाडया सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी यावेळी याबरोबरच सोलापूरकरिता विशेष गाडी सोडता येत असल्यास रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात यावी अश्या सूचनाही मध्य रेल्वेच्या संबंधितांना दिल्या.
          मुख्यमंत्री यांनी यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी- सुविधांचा आढावा घेतला. मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी येथे  करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची या बैठकीत माहिती देण्यात आली.  तसेच पोलीस, बेस्ट,परिवहन विभागामार्फत 6 डिसेंबरच्या आधी आणि नंतर पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मुख्यमंत्री यांनी यावेळी पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याचे आदेश यावेळी दिले. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, वित्त विभागाचे प्रधान सचिव क्षत्रपती शिवाजी, नगरविकास विभाग (2)चे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास खारगे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, सामजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, मुंबईच्या जिल्हाधिकारी शैला ए., माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, पोलीस महासंचालक संजीव दयाल, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
00000
टोल वसुलीत पारदर्शकता आणा - मुख्यमंत्री
मुंबई, दि.1 : अनेक ठिकाणी टोलच्या बोगस पावत्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.  टोल नाक्यांवर अनेक प्रकाराचा गोंधळ आहे, यासाठी राज्यातील रस्त्यांवरच्या टोलचा नीट आढावा घ्या  आणि टोल वसुलीत पारदर्शकता आणा, अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधितांना दिल्या.
राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या रस्त्यांच्या विकासकामांबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी पीपीपी चे सदस्य सुधीरकुमार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक एम.के.जैन, महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य व्यवस्थापक राजीव सिंग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक ए.के.शर्मा, परिवहन  विभागाचे प्रधान सचिव एस.के.शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक टोल नाक्यांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.  नम्रपणे त्यांनी लोकांशी व्यवहार करण्याची आवश्यकता आहे.  याचबरोबर रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
------0------ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा