बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

शहीदाच्या कन्येला मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय
पुनम धुरगुडे‍ हिची लिपिक पदाऐवजी
सहायक विक्रीकर आयुक्तपदी नियुक्ती
मुंबई, दि. 3 : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बापुसाहेब धुरगुडे यांची मुलगी पुनम हिला आधी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. मात्र तिची प्रथमवर्ग अधिकारीपदी नेमणूक करावी, ही तिच्या आईची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्य करून पुनमला विक्रीकर विभागात सहायक विक्रीकर आयुक्त पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली.
पुनम धुरगुडे हिला 24 जून 2009 पासून मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली असली तरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकास प्रथम किंवा द्वितीय वर्ग श्रेणीमधील शासन सेवेत सामावून घेण्याबाबतची तरतूद 20 जानेवारी 2009 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली. त्यानुसार शहीद बापुसाहेब धुरगुडे यांच्या पत्नी अरूणा धुरगुडे यांनी पुनम हिला सहायक विक्रीकर आयुक्त गट अ यापदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विनंतीची तात्काळ दखल घेऊन याबाबतची कार्यवाही करवून घेतली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
मुंबई शहरावर झालेला हा हल्ला ही एक अपवादा‍त्मक घटना असून त्यामध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेऊन पुनम बापुसाहेब धुरगुडे यांची सहायक विक्रीकर आयुक्त गट अ यापदावर अनुकंपा तत्त्वावर करण्यात आली आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा