बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या विकासाचे प्रकल्प
कालमर्यादेत पूर्ण करावे : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3:  मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या विकासासंदर्भात जे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण, सिडको, मध्य व पश्चिम रेल्वे, एमएमआरडीए यांच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांना गती देवून ते कालमर्यादेत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
          हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या जलद उपनगरी रेल्वे छन्नमार्गाबाबत (कॉरीडॉर) तांत्रीकबाबी अभ्यासण्यासाठी एमआरव्हीसी, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव, सिडको, एमएमआरडीए, मध्य रेल्वेच्या अधिका-यांची समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सहयाद्री अतिथीगृहामध्ये उपनगरीय रेल्वेच्या विकासकामांबाबत आढावा घेणारी बैठक झाली.  त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  ते म्हणाले की, लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे सेवा अधिक गतिमान आणि दर्जेदार होण्यासाठी जे विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत ते तातडीने पुर्ण होणे आवश्यक आहे.  या प्रकल्पांसाठी कालमर्यादा असून ती वेळेत पुर्ण होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल कॉरीडॉर या महत्वाकांक्षी आणि प्रवाशांच्या वेळेत बचत करणा-या प्रकल्पाला चालना द्यावी तसेच एमयुटीपी 2 आणि 3 अंतर्गेत जे प्रकल्प राबविण्यात येत आहेत ते तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी मुंबईतील उपनगरी रेल्वेस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासर्वांचा अभ्यास करण्यासाठी एक एजन्सी नेमण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बैठकीत हार्बर मार्गावर नऊ ऐवजी 12 डब्यांची उपनगरीय सेवा सुरु करणे, एमयुटीपी 2  खर्चातील वाढीस राज्य शासनाने मंजूरी दयावी, ठाणे, मुलुंड, भांडूप जमिनीचा वाणिज्यिक विकास करुन या रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करावी या बाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी संचालक प्रभात सहाय, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सुद, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु पी एस मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, प्रविण दराडे, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा