बुधवार, ३ डिसेंबर, २०१४


शासकीय इतमामात अंत्यविधी
माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले अनंतात विलिन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

अलिबाग दि.3 :- माजी केंद्रिय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांच्या पार्थिवावर रायगड जिल्ह्यातील आंबेत या मूळ गावी शासकीय इतमामात व धीरगंभीर वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना यावेळी श्रद्धांजली आर्पण केली. पोलीसांच्यावतीने मानवंदना देऊन व बंदुकीच्या फैरी झाडुन शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला.
यावेळी श्रध्दांजली वाहतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, बॅ. अंतुले यांची कारकिर्द लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून गाजलेली आहे. तशी त्यांची ख्याती होती. सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास होता. सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय त्यांच्या काळात झाले. लोकांच्या समस्येवर समाधान शोधण्याची त्यांची हातोटी व कल्पकता होती. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता राज्याने गमावला आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लोकप्रतिनिधींना सन्मान व खरी ताकद देण्याची कार्य बॅ.अंतुले यांनी केले असल्याचे सांगितले. तसेच पक्षाभिनेश न बाळगता त्यांनी सर्व कार्यकर्त्यांवर प्रेम केले असल्याचे ते म्हणाले. अनेक नेत्यांनीही यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजी केंद्रिय मंत्री ऑस्कर फर्नाडिस, माजी मंत्री आ.सुनिल तटकरे, आ.माणिकराव ठाकरे, आमदार सर्वश्री. भरतशेठ गोगावले, प्रशांत ठाकुर, सुभाष पाटील, अवधूत तटकरे, कोंकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, कोंकण विभाग परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधिक्षक डॉ.शशीकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा