गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४






वातावरणातील बदल शेतीसमोरील मोठे आव्हान
          लवकरच सिंचनक्षम नवी योजना आणणार : मुख्यमंत्री
       नागपूर, दि. 4 :   वातावरणातील होणारे बदल शेतीसमोरील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी हवामानाच्या अचूक अंदाजासाठी 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारले जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेती ओलिताखाली येण्यासाठी  नवीन सिचंनक्षम योजना आणणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
            नागपूर येथे आयोजित ‘ॲग्रोव्हिजन’ या राष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  केंद्रीय  रस्ते  वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, हरयाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकट, राज्याचे वित्त मंत्री सुनील मुनगंटीवार, खासदार कृपाल तुमाने, खासदार राजू शेट्टी, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशाताई सावरकर, गिरीश गांधी, अप्पर मुख्य सचिव सुधीर गोयल व जिल्ह्याती आमदार  उपस्थित होते.
            केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने भरविण्यात आलेल्या या  प्रदर्शनाचे  सहावे वर्ष असून त्यांचे शेती व शेतकऱ्यांप्रती  असलेला जिव्हाळा वाखाण्याजोगा असल्याचे गौरवोदगार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ,ॲग्रोव्हिजन ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र बनले आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाची  माहिती  आणि उत्पादन क्षमता वाढावी, या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरविण्यात येते. शेतकऱ्यांना मूलभूत  ज्ञान व मार्गदर्शन मिळणे, हे केवळ कृषी प्रदर्शन नव्हे तर हे कृषी आंदोलन झाले असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे  म्हणाले, सध्या शेतकरी मोठया संकटातून वाटचाल करीत आहे. सततची नापीकी आणि दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  आज महराष्ट्रातील 19 हजार गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गारपीट, अतिवृष्टी आणि बाजारभाव यामुळे अवस्था बिकट झाली आहे. परंतु या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठिशी उभे  राहण्याची गरज आहे.
            सिरपूर पॅटर्नवर आधारित  साखळी बंधारे निर्माण केल्यास शेतीला पाणी देता येईल. शाश्वत शेतीबाबत बोलतांना त्यांनी  पाणी व वीज शेतकऱ्यांना देता आली पाहिजे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 लाख सोलरपंप शेतकऱ्यांना  उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना वातावरणातील अचूक  बदल कळण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्र तर दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत स्तरापर्यंत ही केंद्र निर्माण करणार आहोत,   असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले.
           शेतकरी आत्महत्या करतो, ही आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असून ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून सिंचनक्षम प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सिंचनाचे प्रमाण केवळ 18 टक्के आहे. सिंचन क्षेत्र वाढीसाठी छोटे बंधारे निर्माण करण्याची गरज आहे.  किती प्रकल्प निर्माण केले, त्यापेक्षा सिंचन क्षमता किती निर्माण झाली, याकडे लक्ष्‍ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            शेतीसाठीच्या विमा पद्धतीत लवकर बदल करण्यात येणार असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांचा    यात  सहभाग असेल. कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्राचा उपयोग केला तर शाश्वत शेती निश्चित निर्माण होईल. त्याचबरोबर शेती  मालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केले तर स्थानिक स्तरावर रोजगार मिळेल त्यासाठी ठिबक, तुषार व सूक्ष्म  सिंचनासाठी अनुदान वाढवून शेतकऱ्यांना  त्याकडे प्रवृत्त केले जाईल.
            आज मराठवाडा व पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. परंतु संकटाला शेतकऱ्यांनी समर्थपणे सामोरे जाण्याची आवश्यकता असून शासन शेतकऱ्यांच्या  पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांसाठी  प्रसंगी  कर्ज  काढू. परंतु कोणीही आत्महत्यांचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            केंद्री रस्ते वाहतूक  मंत्री नितीन गडकरी यांनी  आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या  उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून सातत्याने कृषी  प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात  कार्यशाळा व परिसंवादाच्या माध्यमातून  कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार  आहे. शेतकरी हे केवळ शेतपीकच नव्हेतर  गॅस,  वीज, डिझेल, पेट्रोल तयार करु शकतात. तेल बियांणाचे  उत्पादन वाढले पाहिजे. नागपूर शहरात इथेनॉलवर शहर बस चालविण्याचा  आपण प्रयोग केला. येत्या एक दीड वर्षात सर्व बसेस इथेनॉलवर चालतील. शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धनाची कामे होण्याची आवश्यकता आहे.  या  चार दिवसात या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
            वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करु असे सांगत त्यांनी नितीन गडकरी यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. यावेळी ॲग्रोव्हिजन या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
·         मध्य भारतातील सर्वातमोठे कृषी प्रदर्शन.
·         इथेनॉलवर चालू करण्यात आलेल्या ग्रीन बसमध्ये बसून मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी  प्रदर्शनात फेरफटका मारला.
·         रेशीमबाग मैदानात भरण्यात आलेल्या या  प्रदर्शनात राज्य व राज्याबाहेरुन शेतकरी सहभागी झाले होते.

           
*******



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा