शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ
 ‘मी स्वत: अस्वच्छता करणार नाही
आणि दुसऱ्यालाही करु देणार नाही
मुंबई, दि. १४ : मी स्वत: अस्वच्छता करणार नाही आणि दुसऱ्यालाही करु देणार नाही. या कामाची सुरुवात मी स्वत:पासून करेन आणि गावोगावी, गल्लोगल्ली स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करेन, अशी शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शालेय विद्यार्थ्यांना दिली.
राज्यभरात बालदिनानिमित्त १४ ते १९ नोव्हेंबर २०१४ दरम्यान बाल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले येथील माध्यमिक शाळेत शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना तसेच व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून ऑनलाईन जोडण्यात आलेल्या मुंबईतील ४८० शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार, मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्वच्छता पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फतच आपले शहर स्वच्छ होऊ शकेल, अशी धारणा बाळगणे चुकीचे आहे. यासाठी या कामात लोकांनीसुद्धा आपला सहभाग दिला पाहिजे. रस्ते स्वच्छ करण्यापेक्षा रस्त्यांवर कचराच होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी स्वत:ला स्वच्छतेची सवय लावावी, तसेच आपल्या घरातील ज्येष्ठ-वरिष्ठांनाही स्वच्छतेचे पालन करण्याबाबत सांगावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे जोडण्यात आलेल्या मुंबईतील विविध भागांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेच्या आहेत. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावरच आपल्या शासनाचा भर राहील, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व शाळा व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे जोडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थी स्वच्छतादूतांमार्फत स्वच्छतेचा प्रसार – विनोद तावडे
शालेय शिक्षण मंत्री श्री. तावडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेविषयक विविध नियमांचे वाचन करुन घेतले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी देशभरात सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेची आपल्या राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. शाळांच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी स्वच्छतादूत नेमले जातील. शासनामार्फत शालेय गुणवत्ता वाढीसाठीही व्यापक प्रयत्न करण्यात येणार असून राज्यातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले.    

दरम्यान, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत धोबी तलाव येथील एपी मार्केट येथे आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात स्थानिक आमदार राज पुरोहीत, नगरसेविका वीणा जैन यांच्यासह शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरीक आदींनी सहभाग घेतला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा