शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हरित पर्यावरण जपण्याच्या
दृष्टीने उचललेले आणखी एक पाऊल : मुख्यमंत्री
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा कोनशिला समारंभ
मुंबई, दि.14: देशाच्या कृषि क्षेत्रातील प्रगतीत आरसीएफचे योगदान मोठे आहे. आरसीएफच्या खतांमुळे मर्यादित क्षेत्रातून अधिकाधिक कृषि उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आरसीएफने हाती घेतलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आणि शेतकरी हिताच्या योजनांमध्ये महाराष्ट्र शासनाचे सहकार्य आणि सक्रिय सहभाग असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई येथे उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हरित पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने उचललेले आणखी एक पाऊल आहे, असे मतही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
आरसीएफ, बीपीसीएलच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा कोनशिला समारंभ आज प्रियदर्शनी मैदानावर केंद्रीय खते व रसायने मंत्री अनंत कुमार यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी खते व रसायने विभागाचे सचिव जुगल किशोर महापात्रा, राजीव यादव, आरसीएफचे अध्यक्ष आर.जी. राजन आदी मान्यवर उपस्थित होते.
         
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे आणि त्याच दिवशी पर्यावरण जपवणुकीत भर टाकणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन ही चांगली सुरुवात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील लोकसंख्या वाढते आहे. स्वच्छता, प्रदूषण व पाण्याच्या अडचणी वाढत आहेत. पाण्याचा पुर्नवापर करण्यासोबतच पाण्याचा एक एक थेंब जपावा लागेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ महाराष्ट्र यासाठी आपले योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याची उपलब्धी व वापर याबाबींकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय खते व रसायने मंत्री अनंत कुमार म्हणाले, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर असलेल्या या प्रकल्पामुळे प्रत्येक दिवसाला 22.7 मिलीयन लिटर सांडपाण्याचे 15 मिलीयन लिटर शुध्द पाण्यात रुपांतर होणार आहे. यामुळे शहरातील शुध्द पाण्याची बचत होणार असून हा प्रकल्प शाश्वत विकासाकडे नेणारा आहे.
आरसीएफचे अध्यक्ष आर.जी. राजन म्हणाले, अत्याधुनिक यंत्र सामुग्री सोबत राबविला जाणारा हा पहिला प्रकल्प असून यासाठी 200 करोड इतका खर्च आहे. करार तत्वावर हा प्रकल्प राबविण्यास दिल्यास 28 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आरसीएफ अशा क्षमतेचा प्रकल्प 15 वर्षापासून राबवित असून या नव्या प्रकल्पामुळे सांडपाण्याचे शुध्द पाण्यात रुपांतर करण्याची क्षमता दुप्पटीने वाढली असल्याचेही श्री. राजन यांनी यावेळी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा