शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

मराठा व मुस्लीम आरक्षण
मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
आंदोलने न करता शांतता व सुव्यवस्था राखावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.15 : मराठा व मुस्लीम आरक्षणाच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगिती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. आघाडी शासनाने घेतलेल्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते व या खटल्यासंदर्भातील युक्तीवाद विधानसभा निवडणुकीपूर्वी दि.18 सप्टेंबर 2014 रोजीस संपला होता व उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. काल दि. 14 नोव्हेंबर 2014 रोजी उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. या  आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन राज्यात आंदोलने न करता राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहनही श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
          उच्च न्यायालयाच्या या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मंत्रालयात सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्रीमंडळातील सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, खासदार रामदास आठवले, आमदार दिवाकर रावते, नसीम खान, मधु चव्हाण, तसेच विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ॲडव्होकेट जनरल दरायस खंबाटा आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकलेच पाहिजे, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. यासाठीच ताबडतोब सर्वोच्च न्यालयात दाद मागून या निर्णयाला स्थगिती मिळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी विधीतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. उच्च न्यायालयाने राणे समितीच्या अहवालावर ताशेरे ओढल्यामुळे  राणे समितीच्या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ही समिती अधिक माहिती गोळा करेल आणि उपाय सूचवेल. या समितीने अभ्यास करुन दिलेला अहवाल मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेण्यात येईल. तसेच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पक्षीय समिती स्थापन करण्यात येईल, असेही यावेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी सर्वश्री दिवाकर रावते, नसीम खान, विनायक मेटे यांनी याबाबत आपले विचार मांडले.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा