शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

युरीया निर्मितीला चालना देणाऱ्या महाराष्ट्रातील
थळ -3 प्रकल्प विशेष प्राधान्याने पूर्ण करणार
केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांची घोषणा
मुंबई, दि. 15 : साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या महाराष्ट्रातील थळ-3 या युरीया खत निर्मितीस गती देणाऱ्या प्रकल्पाला विशेष प्राधान्य देऊन तो पूर्ण करण्यात येईल. राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्सला ‘नवरत्न’चा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय खते रसायने मंत्री अनंत कुमार यांनी काल येथे केली.
आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड), बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा कोनशिला समारंभ शुक्रवारी प्रियदर्शनी मैदानावर पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या थळ येथे युरीया खत निर्मितीचा तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर युरीया खत निर्मिती दुप्पट होऊन शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेल. युरीयाचा तुटवडा जाणवणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या थळ – 3 प्रकल्पाला विशेष प्राधान्य देऊन पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी आश्वासन दिले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत श्री. अनंतकुमार म्हणाले की, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर असलेल्या या प्रकल्पामुळे प्रत्येक दिवसाला 22.7 मिलीयन लिटर सांडपाण्याचे 15 मिलीयन लिटर शुध्द पाण्यात रुपांतर होणार आहे. यामुळे शहरातील शुध्द पाण्याची बचत होणार असून हा प्रकल्प शाश्वत विकासाकडे नेणारा ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत आरसीएफचे योगदान मोठे आहे. आरसीएफच्या खतांमुळे मर्यादित क्षेत्रातून अधिकाधिक कृषी उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आरसीएफने हाती घेतलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आणि शेतकरी हिताच्या योजनांमध्ये महाराष्ट्र शासनाचे सहकार्य आणि सक्रिय सहभाग असेल. युरीया निर्मितीला गती देणाऱ्या थळ – 3 प्रकल्प कार्यान्वित झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. युरीयाचे उत्पादन वाढल्याने त्याचा तुटवडा जाणवणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेल आणि राज्याच्या कृषी उत्पादनात भर पडेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सांडपाणी प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई येथे उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हरित पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने उचललेले आणखी एक स्वागतार्ह पाऊल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खते व रसायने विभागाचे सचिव जुगल किशोर महापात्रा, राजीव यादव, आरसीएफचे अध्यक्ष आर. जी. राजन आदी मान्यवर उपस्थित होते.  

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा