गुरुवार, १० जानेवारी, २०१३


 दुष्काळग्रस्तांसाठी प्रसंगी धोरण बदलू - मुख्यमंत्री
सातारा,दि. 10 :- राज्यातील दुष्काळी जनतेस पिण्याचे  पाणी, जनावरांच्या छावण्यांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही प्रसंगी दुष्काळग्रस्तांच्या हितासाठी धोरण बदलावे लागले तरी ते बदलू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी आज येथे बोलताना दिली.
पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री  डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बंागर, पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना, राज्याचे वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वासराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट निर्माण झाले असून या दुष्काळी परिस्थितीत जनतेला पिण्याचे पाणी सर्वाथाने उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनासमोरील प्राथमिकता आहे. यासाठी राज्यातील उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. राज्यात उपलब्ध पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचा कटू निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

उरमोडीसाठी 50 कोटी अग्रक्रमाने देऊ : मुख्यमंत्री
माण, खटावमधील दुष्काळग्रस्तांना उरमोडीचे पाणी देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी स्थलातराची वेळ येणार नाही याची काळजी शासन घेत आहे.  माणला पाणी देण्यासाठी  उरमोडी  प्रकल्पातून आठ पंप सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी येणारा 50 कोटीचा निधी अग्रक्रमाने देऊन माण तालुक्याला निश्चिपणे पाणी दिले जाईल.  यापुढे प्रकल्प मंजुर करताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास प्राधान्य राहील. राज्यातील जलसिंचनासाठी 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला असून त्याच्या मंजुरीसाठी शासन पाठपुरावा करीत आहे. तोपर्यंत राज्य शासन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल.
दुष्काळग्रस्तांच्या हितासाठी  प्रसंगी विकास कामे बाजूला ठेऊन दुष्काळनिवारणास प्राधान्य दिले जाईल,  असे सांगून  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यापुढील काळात पाण्याचा काटकसरीणे वापर करणे गरजेचे असून शेती क्षेत्रासाठी आता ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे संयुक्तीक ठरणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांना ऊसासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैधानिक विकास मंडळाच्या धोरणानुसार उपलब्ध होणाऱ्या निधीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असून याकामी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवानही त्यांनी केले.
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या उपसासिंचना योजना समयबध्द कार्यक्रमाद्वारे मार्गी लावल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जिहे-कठापूर योजनेबाबत शासन निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. या योजनेबाबत कोणताही गैरसमज करुन घेऊनये, असे आवानही त्यांनी केले.  ताकारी, म्हैशाळ, टेंभु, उरमोडी, जिहे-कठापूर, तारळी आदी प्रकल्पांच्या कामांना शासन निश्चितपणे गती देईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांना गेल्या वर्षी ए.आय.बी.पी. तून 2100 कोटींचा निधी मिळाला होता. यंदा कमी निधी मिळाला आहे, उर्वरित निधींसाठी पाटबंधारे विभागामार्फत पाठपुरावा केला जात आहे. केंद्राकडून मोठ्या योजनांसाठी निधी मिळवताना या योजनांमधून काही विशिष्ट कामांसाठी विशेत: दुष्काळी जनतेसाठी तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकणाऱ्या कामांना निधी उपलब्ध करुन घेण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  राज्यात सध्या 1210 टँकर सुरु असून अडीच ते तीन लाख जनावरांची छावण्यांमध्ये सोय केली आहे. दुष्काळी गावांमध्ये टँकरचे पाणी केवळ सिन्टेक्स टाक्यांमध्ये टाकणे गरजेचे असून सिन्टेक्स टाक्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यास प्रशासनास सूचना केल्या आहेत. साखर कारखान्यांच्या माध्यमातूनही ट्रक, ट्रॅक्टर मधून सिन्टेक्स टाक्यांद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील पशुधन जोपासण्यासाठी वैरणविकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात वैरण विकासाचा 21 हजार हेक्टरमध्ये चारा लागवडीचा कार्यक्रम घेतला असून यातून 4 ते 5 लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होईल. नजिकच्या कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यातूनही चारा लागवडीचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.
माण तालुक्यासाठी साखळी बंधाऱ्यांचा 10 कोटीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. तसेच जिल्ह्याच्या दुष्काळी भागात नाला सरळीकरण, वनबंधारे, शेततळी, तलावातील गाळ काढणे, सिमेंट बंधारे, साखळी बंधाऱ्यांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जलसंधारणाच्या कामास प्राधान्य दिले आहे. सिमेंट बंधाऱ्यांच्या अधिकाधिक साईट शोधून जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यास प्राधान्य दिले आहे.  राज्यात  1200 कोटी रुपये दुष्काळाकरीता खर्च केले असून. यापुढे लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.  मागेल त्याला काम देण्याची भूमिका शासनाने घेतली असून दुष्काळामुळे लोकांची गैरसोय होणार नाही. याबाबत शासन दक्ष असल्याचे ते म्हणाले.
पुसेगांव येथील सेवागिरी ट्रस्टला दिड कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच देवस्थानच्या जमिनीबाबचा प्रश्न लवकरच सोडविला जाईल. पुसेगांव परिसरात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बटाटा संशोधन केंद्र मंजुर केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, राज्याच्या दुष्काळी 15 तालुक्यात 150 कोटी सिमेंट बंधाऱ्यांचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दुष्काळ निवारणाच्या कामात शासन कटीबध्द असल्याचे ते म्हणाले. चारा छावण्यांसाठी जाचक अटी शिथील करण्याचा निर्णय शासन घेईल. चारा छावण्यांमध्ये केवळ ऑडीटसाठी 5 टक्के राखीव निधी ठेवण्याबरोबरच आठवड्यातून तीन दिवस पेंड देण्याच्या अटीशिवाय अन्य अटी शिथील करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.
याप्रसंगी बोलताना कृषीमंत्री राधकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन कटीबध्द असून राज्यातील सर्व यात्रेच्या ठिकाणी कायमस्वरुपी कृषी माहिती केंद्र कृषी प्रदर्शनाचा उपक्रम राबविला जाईल. शेतकरी ते ग्राहक अशी विक्रीची थेट व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले असून यापुढील काळात अडत व्यवस्था संपुष्टात आणण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. शेती महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी गोडावून निर्मितीचा उपक्रम शासनाने हाती घेतला असून शेतकऱ्यांनी गोडावूनमध्ये ठेवलेल्या मालाच्या पावतीवर 80 टक्के कर्ज देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. दुष्काळी भागातील पशुधन जोपासण्यासाठी कृषी विभागामार्फत चारा लागवडीचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी वैरण विकास योजनेअंतर्गत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयकुमार गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सेवागिरी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी स्वागत प्रस्ताविक केले. समारंभास सुरेंद्र गुदगे, धैर्यशील कदम, किरण बर्गे, जयश्री भोज, रजनी पवार, विजयराव कणसे, बी.एम. बावळेकर यांच्यासह अनेक मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

वखार महामंडळाच्या गोदाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुसेगांवात भूमिपूजन
        सातारा,दि. 10 :- पुसेगाव येथे वखार महामंडळाच्या वतीने 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या नियोजन शितगृह गोदामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
        कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वडूज उपबाजार आवार पुसेगांव येथील अडतगाळे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे शितगृह गोदाम उभारण्यात येत असून यासाठी वखार महामंडळाने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या भुमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बंागर, पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना, राज्याचे वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
        प्रारंभी वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले यांनी स्वागत करुन या प्रकल्पाची माहिती दिली. बाजार समितीचे सभापती सोमनाथ माळी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक शरद यादव, व्यवस्थापक ज्ञानेश्वर आध्रे आणि महाव्यवस्थापक राम केसवानी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
0000
सेवागिरी महाराजांच्या रथत्सावाचे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुजन

        सातारा, दि. 10 :- पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथत्सावाचे पुजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात करण्यात आले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,  आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस. पऱ्हाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर, डॉ. दिलीप येळगावकर,      डॉ. सुरेश जाधव, प्रदिप विधाते, सुरेंद्र गुदगे आदी मान्यवर तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा