राज्यपाल के. शंकरनारायणन् यांचा शपथविधी
मुंबई, दि. 7 : महाराष्ट्राच्या
राज्यपालपदी फेरनियुक्ती झालेले के. शंकरनारायणन् यांनी आज
राजभवनात राज्यपालपदाची शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शाह यांनी राज्यपालांना शपथ दिली.
प्रारंभी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी राष्ट्रपतींकडून
आलेले के. शंकरनारायणन् यांच्या
नियुक्तीचे अधिपत्र वाचून दाखविले. शपथविधी सोहळ्याची सुरुवात व समारोप
राष्ट्रगीताने झाला. सोहळ्यास राज्यपालांच्या पत्नी श्रीमती राधा शंकरनारायणन्,
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते विनोद तावडे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर,
ज्येष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
शपथविधीनंतर
नौदलाच्या जवानांनी राज्यपालांना मानवंदना दिली.
0 0 0 0 0
हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनासाठी नगरविकास
विभागाच्या
अतिरिक्त मुख्य सचिवांनी बैठक घ्यावी
-
मुख्यमंत्री
मुंबई
दि. 7 : जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्टसाठी संपादित केलेल्या हनुमान कोळीवाड्याचे
दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी
रायगड जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रश्नावर त्वरित योग्य निर्णय घ्यावा,
अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पोलीस महासंचालक के. सुब्रम्हण्यम्, सामान्य
प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस. मीना यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित
होते.
जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्टसाठी 1986 मध्ये 12
गावांची जमीन संपादित केली होती. या 12 गावांपैकी शेवा कोळीवाड्याचे बोरीपाखाडी
येथे पुनर्वसन करण्यात येऊन त्या गावाला हनुमान कोळीवाडा असे नाव देण्यात आले.
परंतु तिथे वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याने या गावाचे दुसऱ्यांदा अन्य ठिकाणी
पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या नौवहन
विभागाने अर्थसहाय्य मंजूर केले असल्याचे आज लोकशाही दिन कार्यक्रमात नगरविकास
विभागातर्फे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अर्जदार मनोहर काशिनाथ कोळी आणि रमेश
भास्कर कोळी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुनर्वसनासंबंधीच्या
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या विचारात घेऊन यातून योग्य मार्ग काढण्याच्यादृष्टीने
नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी बैठक आयोजित करावी, अशा सूचना दिल्या.
आतापर्यंत 64 लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
असून यामध्ये प्राप्त स्वीकृत म्हणजे 1758 अर्जावर कार्यवाही करण्यात आली आहे. आजच्या
लोकशाही दिन कार्यक्रमात सहा अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी झाली.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा