मंगळवार, १५ मे, २०१२


राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने
दुध भुकटी घेण्यासाठी शासन आग्रही -     मुख्यमंत्री
        मुंबई, दि. 15 : राज्यामध्ये 24 हजार मेट्रिक टन दुध भुकटीचा साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुध भुकटी उत्पादकांची अडचण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 15 हजार मेट्रीक टन दुध भुकटी खरेदी करावी, यासाठी शासन आग्रही राहिल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
        राज्यातील दूध संघ, प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादकांच्या समस्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आमदार विनय कोरे आमदार सुरेश धस, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील आणि दुध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
        राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 15 हजार मेट्रिक टन दुध भुकटी पावडर घेतल्यास प्रति किलो मागे 15 रुपयांचा खर्च राज्य शासन उचलेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने जाहीर केलेला प्रति लिटर 17 रुपये दुध खरेदीचा दर दुध उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा हा शासनाचा प्रयत्न असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर 12 एप्रिल 2012 रोजी शासनाने दुध भुकटी प्रकल्पांना दुधाची पावडर करण्यासाठी प्रतिलिटर 2 रुपये एवढे अनुदान जाहीर केले होते. त्या अनुदानास 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिली जाईल. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास त्याचा फेरआढावा घेवून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
        दुध भुकटी उत्पादनाचा खर्च 180 रुपये प्रति किलो आहे. राज्यातील दुध भुकटी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 165 रुपये प्रति किलो दराने करावी, अशी शासनाची मागणी आहे. सध्या दुध भुकटीचा दर सुमारे 135 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे प्रतिकिलो 45 रुपयांचा तोटा अपेक्षित आहे. त्यापैकी 1/3 म्हणजे 15 रुपये प्रति किलो राज्य शासन, केंद्र शासन आणि संबंधित प्रकल्पाने सोसावा, तसेच राज्य शासनाने दुध भुकटीसाठी दिलेल्या अनुदानापोटी 14 मे 2012 पर्यंत सुमारे 14 कोटी 6 लाख रुपये खर्च केला असून 31 मे 2012 पर्यंत आणखी 6 कोटी 16 लाख रूपयांची आवश्यकता आहे.
        राज्यात दुधाचे संघटित क्षेत्रात प्रतिदिन 113 लाख लिटर दुध संकलित होते. यापैकी 36 लाख लिटर सहकारी तर उर्वरित खाजगी व शासनातर्फे दुध संकलित होते. दुधाची प्रत्यक्षात 75 लाख लिटर प्रतिदिन विक्री होते. 10 लाख लिटर दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात, तर 28 लाख लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटी आणि लोण्यामध्ये केले जाते. तसेच आजपर्यंत 24 हजार मेट्रिक टन दुध भुकटीसाठा पडून आहे. यामुळे दुध भुकटी उत्पादकांसमोर खेळते भांडवल आणि साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा