मंगळवार, १५ मे, २०१२



प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीसाठी
25 हजार रुपये देण्यात येईल
- मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 15 :  धरण प्रकल्पग्रस्तांना घर बांधणीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करुन 25 हजार रुपये इतका निधी देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चहाण यांनी आज दिले.  श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळासह मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
        या बैठकीला जलसंपदा मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
         कौशल्य विकास अभियाना अंतर्गत प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले. धरणग्रस्त गावांतील 500 लोकवस्ती असलेल्या गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा देण्यासंबंधीचा निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
0 0 0 0 0

राज्यपाल, मुख्यमंत्री यांची मालदीवच्या अध्यक्षांसमवेत भेट

        मुंबई, दि. 15 : पाच दिवसांच्या भारत भेटीवर असलेले मालदीव गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मोहमद वहीद हसन यांची आज राज्यपाल के. शंकरनारायणन व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत राजभवन येथे भेट झाली.
        यावेळी बोलताना डॉ. वहीद यांनी महाराष्ट्रासोबत व्यापार व आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मालदीवला सध्या वीजनिर्मिती क्षेत्रामध्ये सहकार्य हवे असून भारतातील वीजनिर्मिती कंपन्या मालदीवला सहकार्य करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल व मुख्यमंत्री यांना मालदीव भेटीचे निमंत्रण देताना भारत व मालदीव या देशामध्ये पर्यटन, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व व्यापार क्षेत्रातील संबंध वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा