'ज्वालाग्राही पाकिस्तान' ग्रंथामुळे
नव्या अध्याय पर्वाची सुरुवात
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पुणे,
दि. 13 : ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांच्या 'टिंडर बॉक्स ऑफ पाकिस्तान्स पास्ट ऍ़न्ड फ्युचर ' या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेले 'ज्वालाग्राही पाकिस्तान' या ग्रंथनिर्मितीमुळे ऐतिहासिक पैलूंवर भाष्य करणाऱ्यांसाठी नव्या अध्याय पर्वाची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सरहद रिसर्च सेंटर आणि चिनार पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित व रेखा देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या 'ज्वालाग्राही पाकिस्तान' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. प्रकाशन समारंभास या पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ
पत्रकार एम.जे. अकबर अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरहद संस्थेचे संजय
नहार, अरविंद गोखले, भारत देसरला, आदित्यराज शहा, लेखिका रेखा देशपांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आतंकवादाचे संकट भारत देशा पुरतेच मर्यादीत नसून पाश्चात्य देशांवरही असल्याचे वेळोवळी स्पष्ट झाले आहे. आतंकवादाचा मुकाबला करण्यासाठी अधिकाधिक शक्ती खर्च होत आहे. समोरासमोर युध्दाची रणनिती 1971 पासून पाकिस्तानने बदलली आहे. त्यामुळे आतंकवादी कारवाया, दहशदवाद, प्रत्यक्ष हल्ले, भारतातील आर्थिक राजधान्यांवरील हल्ले, हा त्यांच्या रणनितीचाच एक भाग बनला आहे. या रणनितीचा अभ्यास व संशोधनासाठी ज्वालाग्राही पाकिस्तान हे पुस्तक उपयुक्त असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यातल्या सरहद या संस्थेने काश्मिरमधील गावातील मुलांना दत्तक घेवून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, संस्कार दिले जात आहे. हे पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या औदार्याचे उत्तम उदाहरण आहे.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, भविष्यात पाकिस्तानचे विघटन होईल काय? असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला
आहे. त्याउलट भारतात तशी परिस्थिती नाही आणि विकासाचा दर वाढत आहे, हाच पाकिस्तानचा पोटशूळ आहे. कारगील
युध्दानंतर केंद्र सरकार व राज्य
सरकार यांच्या गुप्तचर संघटना सतर्क राहिल्या पाहिजेत, असे सांगून ते पुढे म्हणाले, पाकबरोबर आर्थिक संबंध, लोक संवाद असणे गरजेचे आहे. व्यापार वृध्दी, गुंतवणूकीकरण याद्वारे युध्द न करता
भारत-पाकचे संबंध बदलू शकतील. 'ज्वालाग्राही पाकिस्तान' या पुस्तकातून चांगल्या पैलूंवर प्रकाशझोत पडल्याने शेजारी राष्ट्राची चांगली बाजू देशासमोर आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्वालाग्रही पाकिस्तान या एम.जे. अकबर लिखित व रेखा देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तक ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात एम.जे.अकबर यांनी भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या ऐतिहासिक व सद्य
परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, वयोमनापरत्वे इतिहास कालखंडाची गणना
करणे चुकीचे आहे. इंग्रजांनी भारतात आधुनिकता आणली, असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. बक्सारच्या लाढईनंतर बंगालमध्ये 10 लाख नागरिक दुष्काळामुळे मरण पावले. परंतू इंग्रजांनी या गोष्टीची साधी दखल न घेता,
हा इतिहास उघड होऊ दिला नाही. इंग्रजांची हीच नीती भारताच्या तत्कालीन अध:पतनास कारणीभूत ठरली. भारतातील मुसलमान हा भारतामध्ये सुरक्षित समजतो, असे सांगून अकबर म्हणाले, मी हिंदुस्थानी मुसलमान असल्याचा मला अभिमान आहे. भारत व पाकिस्तानमधील नागरिक जेंव्हा परस्परांना भेटतात, तेंव्हा त्यांना कोणत्याही स्वरुपाचा भेद, फरक, परस्परांमध्ये वाटत नाही, हेच या देशाचे वैशिष्ठ्य आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता स्त्री-पुरुष समानता आणि गरीबांचा रायझिंग इंडिया मध्ये हिस्सा या चार सुत्रांवर आपला देश अधिक सामर्थ्यवान बनेल, असा अशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्रांरभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. अकबर यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्हा देऊन सत्कार करण्यात आला. सरहद चे संजय नहार यांनी संस्थेच्या उपक्रमांची प्रस्ताविकात माहिती दिली. अरविंद गोखले यांनी भारत-पाक देशांमधील दृढ होत असलेल्या परिस्थिती बाबत विवेचन केले.
पुस्तकाच्या लेखिका रेखा देशपांडे यांनी पुस्तकाच्या अनुवादामागील भावना आपल्या भाषणात विषद केली. सूत्रसंचालन सतिश देसाई यांनी केले. कार्यक्रमास पुण्यनगरीतील रसिक, साहित्यिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा