शुक्रवार, ११ मे, २०१२


उपेक्षीत घटकांसाठी झटणाऱ्या
अजित सिंग यांचे कार्य आदर्शवत
                                     - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 11 : शरीरविक्रय करणाऱ्या मुली आणि त्यांची अनौरस मुले अशा समाजातील अत्यंत उपेक्षीत घटकांसाठी झटणाऱ्या अजित सिंग यांचे कार्य अद्वितीय आणि आदर्शवत असून समाजाला खऱ्या अर्थाने माणुसकीच्या दिशेने घेऊन जाणारे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव केला. 
' विक' या नियतकालिकामार्फत आज येथील हॉटेल ट्रायडेंट येथे झालेल्या समारंभात श्री. सिंग यांना मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते 2011 चा 'मॅन ऑफ इअर' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, विकचे व्यवस्थापकीय संपादक फिलीप मॅथ्यू, स्तंभलेखिका अनुजा चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. 
 वाराणसी येथील समाजिक कार्यंकर्ते श्री. सिंग यांनी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन, त्यांच्या अनौरस मुलांचे शिक्षण आदीसाठी भरीव कार्य केले आहे. महिलांचा होणारा अपव्यापार रोखण्याकामीही त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या गुडीया या स्वयंसेवी संस्थेमार्फत अशा मुलांसाठी फिरती शाळाही चालविली जाते. श्री. सिंग यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आज या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, प्रसिद्धीपासून दूर राहून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा विक नियतकालिकाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. निस्पृह भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा उपक्रमातून प्रोत्साहन मिळते ; समाजालाही यातून आदर्श व्यक्तींच्या कार्याची ओळख होते त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. प्रसारमाध्यमांच्या संवेदनशीलतेचेच हे प्रतिक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. महिला आणि मुलींचा होणारा अपव्यापार ही अत्यंत गंभीर समस्या असून त्याच्या निराकरणासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
श्री. सिंग यावेळी म्हणाले की, मुली आणि महिलांचा अपव्यापार होणे ही समाजासाठी अत्यंत कलंकीत बाब आहे. अशा अपव्यापारातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने मानवी मुल्ये जोपासणाऱ्या समाजाच्या दिशेने वाटचाल करु शकू, असे ते म्हणाले.

0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा