गुरुवार, १० मे, २०१२


सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करतांना
संबंधित विभागांनी समन्वय साधावा : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्राच्या सीमांवरील परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करतांना परिवहन, विक्रीकर आणि उत्पादन शुल्क विभागांनी योग्य समन्वय साधावा. संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरुन वाहनांचा खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिल्या.
महाराष्ट्र राज्याला लागून गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंधप्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमा आहेत. या सीमावर्ती भागातील सद्या अस्तित्वात असलेल्या 22 सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम परिवहन विभागाने हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण आज मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव एस.के.शर्मा, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, परिवहन आयुक्त व्ही.एन.मोरे, उत्पादन शुल्क आयुक्त संजय मुखर्जी, महामंडळाचे मुख्य प्रकल्प अभियंता सुभाष नागे, विक्रीकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सीमावर्ती भागात अच्छाड (ठाणे), हदखेड (धुळे), नवापूर (नंदुरबार) ही तीन विशाल आकाराची, तर देवरी (गोंदिया) व कागल (कोल्हापूर) ही दोन मोठी सीमा तपासणी नाकी आहेत. तसेच बोरगांव (नाशिक), मुक्ताईनगर (जळगांव), सावनेर(नागपूर), रामटेक (नागपूर), पिंपळकुटी (यवतमाळ), उमरगांव (उस्मानाबाद) आणि मंद्रु (सोलापूर) ही सात मध्यम तपासणी नाकी कार्यरत आहेत. याशिवाय अक्कलकुवा (नंदुरबार), रावेर (जळगांव), चांदूरबाजार (अमरावती), वरुड (अमरावती), राजूरा(चंद्रपूर), बिलोली (नांदेड), देगलूर (नांदेड), मारवडे (सोलापूर), शिनोळी (कोल्हापूर) आणि इन्सुली (सिंधुदुर्ग) ही 10 छोटी सीमा तपासणी नाकी कार्यरत आहेत.
या सर्व नाक्यांवरुन मोठया प्रमाणात आंतरराज्य मालवाहतूक केली जाते. या नाक्यांवर वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, मालाच्या विक्रीकर किंवा उत्पादन शुल्क संबंधीत कागदपत्रांची तपासणी व शुल्क संकलन आदी कामे केली जातात. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई केली जाते. सध्या ही संपूर्ण कार्यवाही नाक्यांवरील अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. या नाक्यांचे संगणकीकरण व आधुनिकीकरण केल्यामुळे या नाक्यांवरील वाहनांचा खोळंबा टळण्यास मदत होणार आहे. तसेच परिवहन, विक्रीकर व उत्पादन शुल्क विभागाच्या विविध तपासण्या अत्यंत कमी वेळात पार पडू शकतील.


आजच्या सादरीकरणामध्ये सीमा तपासणी नाक्यावरील आधुनिकीकरणाच्या कामाची नाकानिहाय प्रगती, नाक्यावर वाहनांच्या प्रवेशापासून वाहन बाहेर पडेपर्यंत करावयाची कार्यपध्दती, वाहनाचे वजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचा समावेश होता. नव्या स्वरुपाच्या तपासणी नाक्यामध्ये वाहनांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे, व्हिडीओ कॅमेरे, वाहनांची ओळख पटवण्यासाठी नंबर प्लेट रिडर, प्रत्येक वाहनांचा डेटा तयार करण्यासाठी रेडीओ फ्रिक्वेन्सी, तंत्रज्ञानाचा वापर, तीन विभागांसाठी सामाईक आज्ञावली आदींचा समावेश असेल.
सीमा तपासणी नाक्यांवरील ही तपासणी फक्त मालवाहू वाहनांसाठीच असेल. प्रवासी वाहने, खाजगी मोटारी यांचा यात समावेश असणार नाही. या संपूर्ण प्रणालीची माहिती राज्यातील सर्व मोटार वाहतूकदार संघटना व व्यापारी यांच्या प्रतिनिधींना द्यावी आणि त्यांचे सहकार्य मिळावे अशा सूचना श्री. चव्हाण यांनी दिल्या.
000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा