लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र झालेल्या
कुस्तीगीर नरसिंग यादवला पूर्वतयारीसाठी
15 लाख
रूपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 9 : लंडन येथे 2012 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या
कुस्तीगीर नरसिंग यादव याचे अभिनंदन करून ऑलिंपिकच्या पूर्व तयारीसाठी राज्य विकास
क्रीडा निधीतून तात्काळ एकरकमी 15 लाख रूपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत नरसिंग यादव याने आज मुख्यमंत्र्यांची
सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन केले आणि लंडन ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा
दिल्या.
नुकत्याच मेमध्ये झालेल्या फिनलॅण्ड येथील हेलसिंकी शहरात झालेल्या स्पर्धेत
सुवर्ण पदक पटकावून नरसिंग यादव लंडन 2012 ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.
क्रीडा मंत्री वळवी यांनी त्याच्या कार्यकर्तृत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन
त्याच्या ऑलिंपिकच्या पूर्व तयारीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे
सांगितले.
मुंबईतील जोगेश्वरी भागात स्थायिक झालेल्या नरसिंग हा वडिलांच्या
प्रोत्साहनाने कुस्तीकडे आकर्षित झाला. वयाच्या अकराव्या वर्षापासून कांदिवलीतील
साई अर्थात स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये वाढलेल्या
नरसिंगने कुस्तीचे डाव तिथेच गिरविले. कॅनडात झालेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये
रौप्य, जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्य, 2009च्या कॉमनवेल्थ
रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक, रशिया येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग
चॅम्पियनशिपमध्ये रौप्य त्याचबरोबर सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण, तीन
रौप्य आणि दोन कास्य पदके मिळविली आहेत.
राज्यातील पदकप्राप्त 12 खेळाडूंना राजपत्रित अधिकारी पदावर थेट नियुक्ती देण्यासाठी निवड केली असून त्यात यादव याचा समावेश आहे. त्याने आपल्याला पोलिस खात्यात नियुक्ती देण्याची विनंती
केली आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट
केले. जलतरणपटू वीरधवल खाडे आणि नेमबाजीपटू राही सरनोबत यांनाही यापूर्वी ऑलिंपिक
स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्य शासनामार्फत एकरकमी मदत देण्यात आली होती, असे श्री. वळवी यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा