बुधवार, २ मे, २०१२


भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सेवाप्रवेश
नियम अद्ययावत करावेत - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 2 : भरती प्रक्रिया सुलभ होण्याच्यादृष्टीने प्रत्येक शासकीय विभागाने आपले सेवा प्रवेश नियम अद्ययावत करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
      महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऑनलाईन मागणीपत्र सेवेचा आरंभ आज मंत्रालयात मुख्यमंत्र्‌यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के.पी. बक्षी, मुख्यमंत्र्‌यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सचिव आशिष कुमार सिंह, माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव राजेंद्र मंगरुळकर, अध्यक्ष डॉ. धनंजय येडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणाले की, सेवाप्रवेश नियम तयार नसल्यामुळे अधिकारी  आणि कर्मचारी यांची भरती करताना अडचणी निर्माण होतात. काही सेवाप्रवेश नियम अनेक वर्षांपूर्वी तयार झालेले असल्याने कालमानपरत्वे त्यात बदल करणे अपरिहार्य असते. असे बदल करुन प्रत्येक विभागाने आपले सेवाप्रवेश नियम अद्ययावत करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केले.
        ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारा प्रत्येक विभागातर्फे त्यांच्याकडील आवश्यक पदांची शिफारस एका नोडल ऑफिसर मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे करण्यात येणार आहे.
        सन 1998 -99 पासून सन 2011-12 पर्यंत लोकसेवा आयोगाकडे शिफारस करण्यात आलेल्या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सन 1998-99 ते 2006-07 पर्यंत दरवर्षी सरासरी 1305 पदांची शिफारस करण्यात आली तर सन 2011-12 मध्ये 5772 पदांची शिफारस करण्यात आली. सन 2011 मध्ये 7411 पदांची मागणी करण्यात आली. तर सन 2011-12 मध्ये 8729 पदांची जाहिरात देण्यात आली. सन 2011-12 मध्ये 10 लाख 79 हजार 379 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. तर 16 कोटी 7 लाख 22 हजार 531 रुपये एवढे परीक्षा शुल्क प्राप्त झाले अशी माहिती यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. धनंजय येडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
        ऑनलाईन अर्ज प्रणालीमुळे मागणीपत्राची प्रक्रिया गतिमान, सोपी, अचूक, पारदर्शक, कार्यक्षम आणि कागद विरहीत होणार आहे. यामुळे वेळेची बचत होईल तसेच या प्रक्रियेत उणीवा राहणार नाहीत  असेही यावेळी सांगण्यात आले.                                      
---00000----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा