गुरुवार, २९ मार्च, २०१२


सिस्कोच्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना
                           सर्वतोपरी सहकार्य : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 29 : राज्याच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मोठी भुमिका बजावु शकते, हे लक्षात घेऊन सिस्को कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली.
        माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सिस्को सिस्टीम्स या अमेरिकास्थित कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेम्बर्स यांनी आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग सचिव के. शिवाजी, सिस्कोचे आशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष एदझार्द ओवरबिक, सिस्को इंडियाचे व्यवस्थापक नरेश वधवा, कार्यकारी संचालक हरिश कृष्णन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
        माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या सिस्को कंपनीच्या विविध प्रकल्प व उपक्रमांची माहिती श्री. चेम्बर्स यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वसामान्यांचे जीवन अधिकाधिक सुविधायुक्त आणि सुसह्य करण्यासाठी झाला पाहिजे. यादृष्टीने भारतात काही राज्यांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुरक्षा व्यवस्था या क्षेत्रात सिस्को गुंतवणुक  करण्यास उत्सुक आहे, असे श्री. चेम्बर्स यांनी स्पष्ट केले. भारताच्या आपल्या दौऱ्यात श्री. चेम्बर्स यांनी भेट घेतलेले श्री. पृथ्वीराज चव्हाण हे देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. सिस्को ही माहिती तंत्रज्ञान नेटवर्किंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असुन तिची वार्षिक उलाढाल  47 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. भारतातील विविध आस्थापनांमध्ये सिस्कोच्या कर्मचाऱ्यांची संख्या आठ हजारहुन अधिक आहे.
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाला महाराष्ट्र शासनाने सातत्याने प्राधान्य दिले आहे. सर्वसमावेशक विकासासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र महत्वाची भुमिका बजावु शकते. सिस्कोची या क्षेत्राकडे पाहण्याची सामाजिक दृष्टी महत्वाची आहे. त्यांच्या प्रकल्पांचे महाराष्ट्रात स्वागतच केले जाईल, असे श्री. चव्हाण म्हणाले.
                                                        0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा