गुरुवार, २९ मार्च, २०१२


इंदू मिलची जागेबाबत वस्त्रोद्योग सचिवांच्या कमिटीची दिल्लीत बैठक

मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याबाबत आज केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीची बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत हस्तांतरित करण्यात येणाऱ्या 12.03 एकर जागेच्या बदल्यात महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला द्यावयाच्या पुरेशा मोबदल्याची पद्धती निश्चित करण्यात येऊन एप्रिल 2012च्या पहिल्या पंधरवाड्यात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.

 दिनांक 31 डिसेंबर 2011 रोजी पंतप्रधान यांच्यासमवेत सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या 2 जानेवारी 2012 च्या परिपत्रकानुसार एक कमिटी नेमण्यात आली. या कमिटीची पहिली बैठक वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील उद्योग भवनात 29 मार्च 2012 रोजी घेण्यात आली होती.

याप्रश्नी पंतप्रधानांनी दिलेल्या तत्वत: मान्यतेचा विचार करता असे ठरले की, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील संपूर्ण 12.03 एकर जागा महाराष्ट्र शासनाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य स्मारक उभारण्यासाठी हस्तांतरित करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाला या प्रस्तावित स्मारकासाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबत विस्तृतपणे चर्चा झाली.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावतीने महाराष्ट्रातून आलेल्या शिष्टमंडळाने असे मान्य केले की, या भव्य स्मारकासाठी जमिनीचा पुरेसा मोबदला राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला देण्यात येईल. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा बीआयएफआर यांच्या औपचारिक मान्यतेनंतर घेण्यात येईल असे वस्त्रोद्योग सचिव, भारत सरकार यांनी सांगितले.
           या स्मारकासाठी जागेचे हस्तांतरण करताना पर्यावरणविषयक, कायदेशीर बाबी आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने माहिती दिली.  या प्रक्रियेचे मुद्दे व्यापकपणे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला द्यावा लागणाऱ्या मोबदल्याची पध्दती निश्चित करण्यात यावी, जेणेकरून एप्रिल 2012 च्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेता येईल असे कमिटीने ठरविले.
              या बैठकीस श्रीमती किरण धिंग्रा;वस्त्रोद्योग सचिव, भारत सरकार; श्री. रत्नाकर गायकवाड, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन;  श्री. सुबोध कुमार, मुंबई महानगरपालिका आयुक्त; श्री. टी. सी. बेंजामिन, अतिरिक्त मुख्य सचिव, नगर विकास; श्री. ए. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव; श्री. बिपिन मल्लिक, निवासी आयुक्त, महाराष्ट्र शासन; श्री. पी. एस. पिल्लई, अध्यक्ष, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ; श्री. सुजित गुलाटी, सह सचिव, वस्त्रोद्योग मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.

----0----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा