शनिवार, ३१ मार्च, २०१२



गुणात्मक कौशल्ये, बौद्धीक संपदेवर
विकासाचे ध्येय गाठणे शक्य - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 31 : नैसर्गिक संसाधनांची आपल्याकडे कमतरता असल्याने मानवी संसाधने, गुणात्मक कौशल्ये आणि बौद्धीक संपदेवरच आपल्याला विकासाचे ध्येय गाठता येईल. आपली लोकसंख्या आणि तरुणांमधील क्षमता पाहता हे सहजसाध्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  
            नरसी मोनजी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ विले-पार्ले येथील भाईदास सभागृहात आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कुलपती अमरीश पटेल, कुलगुरु डॉ. राजन सक्सेना, उपकुलगुरु डॉ. एम. एन. वेलिंग, डॉ. देबाशिष सन्याल, प्रविण गांधी, बी. पी. सेठ, सुनंदन दिवाटीया, जे. पी. गांधी. श्रीमती वर्षा परब आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
            मुख्यमंत्री म्हणाले की, पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी नोकरी-व्यवसायात प्रवेश करतो आणि आपली विद्यार्थी अवस्था संपली असे गृहीत धरतो. हे पुर्णत: चुकीचे असून विद्यार्थ्याने कायम शिकत राहीले पाहीजे. वाढती स्पर्धा, दिवसेंदिवस बदलणारे तंत्र आणि आजची माहिती उद्या कालबाह्य होत असल्याने ती ‘अपडेट’ राहणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी विद्यार्थी अवस्था आयुष्यभर जोपासणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
            जागतिक पातळीवरील आजच्या अटीतटीच्या काळातही आपला देश एक ‘मेजर पॉवर’ म्हणून पुढे येत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यात आजच्या तरुण पिढीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भारतीय तरुण जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. यापुढेही माहिती, ज्ञान आणि दर्जेदार शिक्षणाचा आधार घेत तरुणांनी वाटचाल केल्यास सक्षम राष्ट्र म्हणून भारताची निश्चितच दखल घेतली जाईल. तो दिवस फार दूर नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होत आहेत. तरुणांच्या साथीने या कार्यास अधिक गती प्राप्त होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.  
            तरुणांनी फक्त एकाच विषयाच्या शिक्षणावर समाधान न मानता कला, संस्कृती, क्रिडा आदी क्षेत्रांमध्येही रुची घ्यावी. एखाद्या विषयात प्राविण्य निश्चितच असावे ; पण त्याच्या जोडीला कला, छंद जोपासल्यास आपले व्यक्तीमत्व अधिक उजळ होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.     
                                                            000000000000             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा