गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

कराड शहरातील विकास कामांबाबत विशेष बैठक


कराड शहराच्या विकासासाठी 25 कोटीचा निधी
तातडीने उपलब्ध देणार.. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
शहराच्या विकासाला भरीव निधी देऊ .. ..उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा, दि. 6 : कराड शहराच्या विकासासाठी 25 कोटीचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलतांना केली. 
 कराड शहरातील विकास कामांबाबत नगरपालिकेमध्ये आयोजित केलेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर, वनमंत्री डॉ. पंतगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती जाधव, नगराध्यक्षा शारदाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 
            कराड शहराच्या दर्जेदार विकासाचा उत्तम आराखडा तसेच विविध विकास योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, त्यानुसार आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कराड नगरपालिकेने शहराच्या विकासासाठी 270 कोटींचा प्रस्ताव सादर केला असून यामध्ये विविध विकास कामांचा समावेश आहे.  शहराच्या विकासाच्या महत्वाकांक्षी योजनांना पुरेसा निधी देवून या योजना दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 
            कराड शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. शहराचा आधुनिक नियोजनबध्द पध्दतीने विस्तारीकरणाचा नवीन विकास आराखडा तयार करुन त्यानुसार शहराचा विकास करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.  कराडचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यास प्राधान्य देण्यात येत असून शहरातील रस्ते, नागरीकरणाचे प्रश्न, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचरा प्रकल्प असे महत्वाचे प्रश्न मार्गी लावले जातील.  शहराच्या रस्ते विकासाचा आराखडा आयआरडीपीच्या माध्यमातून राबविला जाईल. तसेच नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण योजनेतूनही कराड शहराचा विकास साधला जाईल.
            कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा-खेळांच्या सुविधासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  शिवाजी स्टेडियमच्या विकासाबरोबरच यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामासही प्राधान्य दिले जाईल. हजारमाची येथे भूंकप संशोधन केंद्र निर्माण करण्यास मंजूरी मिळाली असून भूकंप अभ्यासाकरीता हजारमाची येथे 200 एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भूगर्भ  शास्त्रीय प्रयोगशाळाही स्थापन करुन भूकंपाचा अभ्यास भूगर्भीय हालचाली भूकंपाच्या पूर्वसुचनेबाबत संशोधन  केले जाईल. 
            कराडच्या विमानतळाच्या धावपट्टीवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, विमानतळाच्या धावपट्टी वाढीचा प्रश्न सर्व संबंधितांशी चर्चा करुन सोडविला जाईल.  धावपट्टीसाठी लागणारी जमीन भुसंपादनाबाबतची कार्यवाही करताना शेतकऱ्याना पूर्णपणे विश्वासात घेतले जाईल,  त्यांच्याशी चर्चा करुनच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.             कराड येथील सर्कीट हाऊस येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध बैठकासाठी सुसज्ज सभागृह एक बिझनेस सेंटर म्हणून विकसित करण्यात येत आहे. कराड शहरातील रस्ते विकासाबरोबरच नगरोत्थान योजनाही राबविली जात आहे. कराड शहरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधा आदी गोष्टींना शासनाने प्राधान्य दिले असून यासाठी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली.    
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनामार्फत अनेकविध कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे. जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून आणखीन इतर विचारवंत, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,  नेते, कार्यकर्ते यांचाही या समितीत समावेश करुन या समितीची लवकर बैठक कराड येथेही  घेतली जाईल. 
शहराच्या विकासाला भरीव निधी देऊ .. ..उपमुख्यंमंत्री अजित पवार
            कराड शहराच्या विकासाला भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, मात्र या निधीतून होणारी विकास कामे अतिशय दर्जेदार गुणात्मक करणे गरजेचे असल्याचे मत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. 
             राज्यातील नगरपालिकांसाठी राज्य शासनाने नगरोत्थान योजना लागू केली असून पहिल्या टप्यात काही नगरपालिकांचा समावेश झाला आहे.  कराड नगरपालिकेचाही या योजनेत लवकरच समावेश केला जाईल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. कराड शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन करावे त्यासाठी शासन स्तरावरुन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कराड शहराचे नागरीकरण वाढत असून शहरावासीयांना पायाभूत नागरी सुविधा देण्याबरोबरच शहराचा दर्जेदार विकास करणे गरजेचे आहे.  यामध्ये पिण्याचे शुध्द पाणी , स्टेडियम, भुयारी गटारी योजना, रस्ते आदी गोष्टींचा समावेश आहे. शहराचा विकास करतांना विशेषत: रस्ते विकासासाठी काही कटू निर्णय घेणे गरजेचे आहे, मात्र नागरिकांची सोय करणे तितकेच महत्वाचे आहे. 
            यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाचे नुतनीकरण करण्यास  राज्य शासनाचे प्राधान्य राहील असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  कराडच्या विमानाची धावपट्टी वाढविणे गरजेचे असून त्यासाठी जमीन घ्यावी लागेल, मात्र लोकांचे समाधान करुन जमीन घेण्यावर शासनाचा भर राहील.  कराड शहराजवळच्या पूरसंरक्षक भिंतीचे काम नव्या पूलापर्यंत वाढविणे गरजेचे आहे.  त्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.
 याप्रसंगी आमदार विलासकाका पाटील यांनी शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा असे सूचविले.  प्रारंभी मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी कराड शहराच्या विकासासंदर्भातील प्रस्तावांचे सादरीकरण केले.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, आमदार विलासकाका पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार जयकुमार गोरे, उपनगराध्यक्ष सुभाष डुबल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
00000












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा