सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

गझल गायक पद्मभूषण श्री. जगजीत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक संदेश



सर्वसामान्य रसिकाला गजल गुणगुणायला लावणारे
जगजीत सिंह यांची उणीव सतत जाणवेल -मुख्यमंत्री

मुंबई, दि. 10 ऑक्टोबर : अगदी सर्वसामान्य रसिकापर्यंत गजल पोचवुन ती त्याला गुणगुणायला लावण्याची अद्भूत ताकद सुप्रसिद्ध गझल गायक आणि संगीतकार जगजीत सिंह यांच्यात होती. त्यांनी गायिलेल्या गजला आपल्यासोबत कायम राहणार असल्या तरी त्यांची उणीव मात्र कायम जाणवेल, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
गझल गायक पद्मभूषण श्री. जगजीत सिंह यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, गजल किंग म्हणून लोकप्रियता मिळविलेल्या जगजितसिंह यांनी संगीताच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. गजल हा प्रकार त्यांनी अत्यंत सोपा केला आणि रसिकांपर्यंत पोचवला. त्यांच्या पत्नी श्रीमती चित्रा सिंह यांच्यासह त्यांनी गायिलेल्या अनेक गजलांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी अशा विविध भाषांमध्ये गायन हा त्यांचा एक अनोखा पैलु होता. गझल गायनाच्या क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ त्यांची कारकीर्द राहिली आहे. त्यांचे अनेक अल्बम घराघरात पोचले आहेत. गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत आणि लोकसंगीताच्या क्षेत्रातही त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने लोकप्रिय गझल सम्राट आपण गमावला आहे.
त्यांनी गायलेली तुमको देखा तो यह खयाल आया, वो कागज की कश्ती-वो बारिश का पानी, होठोंसे छुलो तुम, मेरा गीत अमर कर दो, ये तेरा घर ये मेरा घर, होशवालों को खबर क्या जिंदगी क्या चीज है,  तुम इतना जो मुस्कुरा रहे हो या जगजीत सिंह यांनी गायलेल्या गझल अविस्मरणीयआहेत.  
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा