वृत्तपत्रांनी जबाबदारीने लेखन करण्याची गरज
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 10 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित राहिले आहे. कोणत्याही घटनेच्या दोन्ही बाजू जनतेसमोर येणे गरजेचे असल्याने प्रिंट मिडियाने अतिशय जबाबदारीने लेखन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केले.
''प्रहार '' दैनिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी दैनिकाचे संपादकीय सल्लागार तथा उद्योग मंत्री नारायण राणे, संचालक खासदार निलेश राणे, संचालक नितेश राणे, आमदार सर्वश्री कृपाशंकर सिंह, राजन तेली, रवींद्र फाटक, सुभाष चव्हाण, निलेश पारवेकर, संपादक आल्हाद गोडबोले, बाजीराव दांगट, रवी शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने माहितीचा अधिकार हा कायदा 2005 साली अंमलात आणला. माहितीच्या अधिकारामुळे अनेक प्रकरणे उघड झालीत. माध्यमाच्या अवास्तव वृत्तांकनामुळे एखाद्या व्यक्तीची राजकीय कारकीर्द उध्वस्त होऊ शकते. त्यामुळे वृत्तपत्रांनी जबाबदारीने आपली भूमिका बजवावी.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकासामुळे अतिशय उत्कृष्ट अशी वर्तमानपत्रे प्रकाशित होत आहेत. ''प्रहार'' दैनिकाचे डिझाईन उत्कृष्ट असून दैनिकाने अल्पावधीतच विश्वासार्हता संपादन केली आहे. नारायण राणे यांची अभ्यासूवृत्ती असून त्यांनी गेली 45 वर्षे अत्यंत खडतर परिस्थितीत राजकीय, सामाजिक वाटचाल केली आहे. दैनिकाच्या आवृत्या पुणे, सातारा, कोल्हापूर येथे लवकरच सुरु होत असून दैनिकाचा राज्यभर विस्तार व्हावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सध्याच्या परिस्थितीत मराठी वृत्तपत्र चालविणे अत्यंत कठिण आहे असे सांगून नारायण राणे म्हणाले की, पत्रकारितेचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. पुणे येथे प्रहार दैनिकाची छपाई लवकरच सुरु होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दैनिकाचे संपादक आल्हाद गोडबोले, कृपाशंकर सिंह यांची समयोचित भाषणे यावेळी झाली. संगीतकार अनुप शंकर, बाल गायक कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, अश्मत हसमी यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा