प्रतापगडच्या पायथ्याशी जिवा महाला यांचे स्मारक उभारणार
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. 13 : छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी जिवा महाला यांचा इतिहास पुढील पिढीस समजावा यासाठी जिवा महाला यांचे प्रतापगडच्या पायथ्याशी राष्ट्रीय स्मारक उभारले जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
बलुतेदारांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. प्रतापगडाच्या लढाईत सरदार अफजल खानाचा वध झाल्यानंतर खानच्या सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाला यांनी मध्ये पडून वार झेलला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. याप्रसंगी जिवा महाला यांना वीरमरण आले. ``होता जिवा म्हणून वाचला शिवा`` अशी म्हण आजही प्रचलित आहे. या जिवा महाला यांचे स्मारक उभारावे, यासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या स्मारकाच्या माध्यमातून इतिहास मांडता येईल, यासाठी आवश्यक ती समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन ही संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आहे. याठिकाणीही त्यांचे भव्य असे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी राज्य शासनाच्या विचाराधीन असून याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बारा बलुतेदारांपैकी धोबी, न्हावी, कुंभार, लोहार, सोनार, सुतार या सहा घटकांना आर्थिक न्याय आणि आवश्यक ते प्रशिक्षण देण्याबाबतही पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटक समान पातळीवर यावेत यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला आमदार व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह, बुलतेदार संघटनांचे प्रतिनिधी बालाजी शिंदे, कल्याणराव दळे, देवराव सोनटक्के, चंद्रकांत गवळी, प्रकाश सोनवणे, वसंतराव वठारकर, दत्तात्रय बन्ने, कल्याणराव शिंदे, संजय भिलकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.