गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक


राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य संस्कृती
मंडळाच्या एकत्रिकरणास तत्वत: मान्यता

          मुंबई दि. 13 : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या एकत्रिकरणास आज राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
          मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री  तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र दर्डा, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मराठी भाषा विभागाचे सचिव विजय नाहटा, नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य सर्वश्री डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. रमेश पानसे, उल्हास पवार,  उषा तांबे हे इतर शासकीय सदस्य,  राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक मधु मंगेश कर्णिक,  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आदी मान्यवर उपस्थित होते.
          दोन्ही संस्थांच्या कामामधील पुनरावृत्ती टाळून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि वाड:मय अधिक समृद्ध करण्यासाठी, मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्यापक करण्यासाठी आणि मराठी भाषेचे संशोधन अधिक सखोल होण्यासाठी या निर्णयास मान्यता देण्यात आली असून असे करतांना दोन्ही संस्थांचे उद्देश, उपक्रम आणि ध्येय यांची जपणूक केली जाईल अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  कायदेशीरदृष्टया या निर्णयाची अंमलबजावणी कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सचिव, मराठी भाषा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती आपला अहवाल दोन महिन्यात सादर करील. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
          मराठी भाषेच्या विकासासाठी विभागामार्फत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. एकात्मिक प्रयत्नातून मराठी भाषेचा विकास करतांना  मराठी भाषेतील अनेक आयाम यावेळी लक्षात घेतले जात आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता करून देतांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे. मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करणे आणि इतर भाषांमधील साहित्य आपल्या भाषेत म्हणजे मराठीत आणणे ही गोष्ट ही तितकीच महत्वाची असून त्यादिशेने व्यापक काम करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी साहित्य हे वैश्विक पातळीवर नेले पाहिजे.  तंत्रज्ञानाने  संदर्भांची प्रचंड ताकद निर्माण केली आहे. त्याचा आणि विविध प्रसार माध्यमांचा  उपयोग मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी करून घेतला पाहिजे. 
          लोकांना चांगली पुस्तके वाचायला आवडतात, पण ती ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आज पाहिजे तेवढी जागा नाही हे लक्षात घेऊन त्यांची वाचनाची गरज भागविण्यासाठी जुने ग्रंथ जे कॉपीराईटच्या बाहेर गेले आहेत ते दृक-श्राव्य स्वरूपात प्रमाण भाषेत उपलब्ध करून दिल्यास वाचकांना हे डिजिटल ग्रंथालय आपल्या बॅगेत बरोबर नेता येईल आणि आपल्या सवडी आणि आवडीनुसार वाचनाची गरज भागवता येईल.         
          या दोन्ही संस्थांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांची विक्री अधिक जोमाने करण्यासाठी मराठी भाषा विभागामार्फत प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
          मराठी भाषा सचिव श्री. नाहटा यांनी यावेळी या दोन्ही संस्थांमधील रिक्त जागा भरण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे दोन्ही संस्थानी प्रकाशित केलेल्या ग्रंथांची विक्री करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, जिल्हा माहिती कार्यालयात ग्रंथ विक्री दालन आणि ग्रंथोत्सवासारख्या कल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
. . .  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: