शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

माण व खटाव तालुक्यांविषयी बैठक



माण व खटाव तालुक्यात जलसंवर्धनासाठी
सिमेंटचे बंधाऱ्यांचा पथदर्शी प्रकल्प राबवावा
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : सातारा जिल्हयातील माण व खटाव या अवर्षणप्रवण तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणलोट विकासासह जलसंवर्धनाचा व सिमेंटचे बंधारे बांधण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. माण-खटाव तालुक्यातील अवर्षणासह अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव जे. एस. सहारिया, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. रमेशचंद्र सागर, पाटबंधारे विभागाचे सचिव एकनाथ पाटील, कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, माण व खटाव तालुके हा अवर्षणप्रवण आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहेत. या तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे आवश्यक आहे. त्यामुळे या भागातील पाणलोटांचा सखोल अभ्यास करुन माथा ते पायथा या सूत्राने पावसाचे सर्व पाणी अडविण्यासाठी सिमेंटचे बंधारे उपयुक्त व टिकाऊ होऊ शकतात. असे बंधारे बांधल्यास 60 गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प राबविल्यानंतर राज्यातील इतर दुष्काळप्रवण जिल्ह्यांसाठीही टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबविता येईल.
या भागातील पावसाचे नगण्य प्रमाण आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता या भागात शेती किफायतशीर होत नाही. त्यामुळे या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
माण-खटाव तालुक्यांना नवीन एमआयडीसी मंजूर करावी, शेतजमिनीवरील जिहे कटापूर योजनेच्या पुनर्वसनाचा स्लॅब उठवावा, माण तालुक्यातील 16 गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा, म्हसवड तालुक्याची निर्मीती करावी, म्हसवड शहरात क्रीडांगण, नाट्यगृह, स्मशानभूमी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, धनगर समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यात यावे, तसेच शिखर-शिंगणापूर व म्हसवड शहरातील सिद्धनाथ या देवस्थानांना पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सादर केले. 
                                      0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा