आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गतीमान प्रशासन देणार - मुख्यमंत्री
परभणी, दि. 7: आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छ, पारदर्शक आणि गतीमान प्रशासन देण्यास आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
येथील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासन हे आपले आहे, अशी भावना जनतेमध्ये निर्माण होण्यासाठी जनतेशी संबंधित सात-बारा उतारा, जमीन व्यवहार, फेरफार, विविध प्रकारचे दाखले या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रशासनात गतीमानता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
प्रशासनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टिने राज्यात सुवर्ण जयंती महसूल अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून पाणंद, शेतरस्ते झाले, तसेच जुने अभिलेख संगणकावर स्कॅनिंग करुन जतन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणकावर 7-12 उतारे मिळू शकतात. केंद्राच्या मदतीने राज्यातील जमिनीच्या पुनर्सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मोजणी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आपली मते मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणावर होतो. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग इथे निर्माण झाले तर त्यांना मदत करण्यात येईल. परभणी जिल्ह्यात 2 हजार एकर क्षेत्रावर अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्प राबवू, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कामात सहजता, अचूकपणा आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा सल्ला महसूल अधिका-यांना दिला. राज्यात सुवर्ण जयंती महसूल अभियानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. निश्चित कारण असल्याशिवाय कोणताही फेरफार एक महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, असे सांगून परभणी जिल्ह्यात मानव विकास निर्देशांक वाढीसाठी शेतक-यांनी शेतीबरोबरच दुग्धोत्पादन, कुक्कुट पालन, मत्स्यपालन, रेशीम उत्पादन याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन श्री. थोरात यांनी केले.
पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी महसूल हा प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून विकासासाठी उद्योगधंद्यांच्या उभारणीची आवश्यकता प्रतिपादन केली.
प्रा. फौजिया खान यांनी शिक्षणाचा हक्क, पटपडताळणी, राजीव गांधी आरोग्य योजना, पंचायत राज व्यवस्था यावर आपली मते मांडून स्वच्छ प्रशासनाचे आवाहन केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील किऑस्कचे उद्घाटन केले. कार्यक्रमांत परभणीच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘विकासपर्व’ या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार गणेश दुधगावकर, आमदार सुरेश देशमुख, रामप्रसाद बोर्डीकर, संजय उर्फ बंडू जाधव, सिताराम घनदाट, मीराताई रेंगे पाटील, आमदार अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा