नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांना स्वसंरक्षणार्थ बंदुकीचे परवाने देणार
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार
-
सातारा दि. 6 :- राज्याच्या नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांना स्वसंरक्षणार्थ बंदुकीचे परवाने देण्यासाठी प्रचलित अटी शिथील करण्याबरोबरच पोलीस पाटलांच्या विशेष कार्याच्या गौरवार्थ पुरस्कार सुरू करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे केले.
कराड येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहनराव शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण स्तरावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अंतिम घटक असलेल्याा पोलीस पाटलांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे, त्यांना अधिकाधिका सोयीसुविधा देण्याबाबत शासनाचा कल असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नुकतीच पोलीस पाटलांच्या मानधनात 800 रुपयावरुन 3 हजार रुपये इतकी भरीव वाढ करण्यात आली आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तसेच अवैध धंदे, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जोखीम पत्करुन पोलीस पाटील कार्यरत असतात. याबाबत त्यांना कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा असून पोलीस पाटलांना अधिकाधिक सुविधा देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आपल्या भाषणात म्हणाले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले, अत्यल्प वेतनामध्ये पोलीस पाटील अहोरात्र गावपातळीवर करत असलेल्या कामाची दखल घेऊन पोलीस पाटलांच्या वेतनवाढीचा प्रस्तावास शासनस्तरावर तत्वत: मान्यता देण्याबरोबरच पोलीस पाटलांना कायदेविषयक आवश्यक ज्ञान देण्यासाठी जिल्हा पातळीवर कायदेविषयक प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मानपत्र, चांदीची तलवार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहनराव शिंगटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व विविध गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा