गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

गोरखनाथ जाधव गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार


गोरखनाथ जाधव गुरुजी यांची
शिक्षण सामाजिक कार्यात उत्तुं कामगिरी
                                                                           - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

         सातारा दि. 6:- कराड येथील गोरखनाथ जाधव गुरुजींनी शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेकविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन जनतेच्या ह्द्‌यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे बोलताना केले.
         कराड येथील वेणुताई स्मृतिसदनामध्ये गोरखनाथ जाधव गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रम समारंभात बोलत होते. समारंभास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा शारदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
          गोरखनाथ जाधव गुरुजी शिक्षणाबरोबर समाजकार्यात अग्रही राहीले. त्यांनी आपल्या कर्तुत्वातून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जाधव गुरुजींनी शिक्षण तसेच समाजकारण समाजाच्या अन्य क्षेत्रामध्ये अनेक माणसे जोडली, त्यांनी शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी, समाजकारण या क्षेत्रात केलेले काम आजच्या नव्या पिढीला आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे.
          शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे कामगिरी केलेल्या गोरखनाथ जाधव गुरुजी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले असून राज्य शासनाचाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे. गुरुजींचे हे कार्य तरुण पिढीला दिशादर्शक ठरेल असा विश्वासही  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. कराड आणि कराडवासी जनता आणि येथील म्युनिसिपाल्टीच्या शाळेतील शिक्षणाचा   माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
          सत्काराला उत्तर देताना गोरखनाथ जाधव गुरुजीं म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील बदलांना सामोरे जाऊन समाजाने विशेषत: शिक्षकांनी शिक्षीत आणि सुसंस्कारीत समाज निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या जीवनातील अनेकविध अनुभव यावेळी विशद केले. गोरखनाथ जाधव गुरुजी यांचा गौरव करणारे खासदार श्रीनिवास पाटील यांचेही भाषण झाले. मानपत्राचे वाचन मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले.
         प्रारंभी गौरव समितीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. समारंभास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन विलासराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, गोरखनाथ जाधव गुरुजी  यांच्या सुविद्य पत्नी सरस्वती जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
                                                                        000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा