सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

श्रीसाई गार्डन मल्टिमिडीया थीमपार्क


श्रीसाई गार्डन मल्टिमिडिया थीम पार्कची
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डी येथे पायाभरणी

          शिर्डी, दि. 10 : शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानच्या वतीने श्रीसाईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित श्रीसाई गार्डन मल्टिमिडीया थीमपार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कसाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला.
          यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
          नियोजित साई गार्डन थीम पार्क शिर्डी शहरापासून सुमारे 5 कि.मी.अंतरावर मौजे निमगाव कोऱ्हाळे हद्दीत श्रीसाईबाबा मंदिर संस्थानच्या मालकीच्या 20 एकर जागेत उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिली
.
          साईगार्डनमुळे मंदिर परिसरातील गर्दीचा ताण कमी होऊन गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होणार आहे. या गार्डनमध्ये वॉटर फाऊंटन व म्युझिक गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, मेडीटेशन गार्डन, थीमपार्क, स्पिरीच्युरल गार्डन, आर्ट गॅलरी, ऑडीटोरियम, सेंट्रल थीम वॉटर फिचर, लेझर शो, म्युझियम, आर्ट गॅलरीसह ग्रंथालय, उपहारगृहे, प्रसाधनगृहे आदी सुविधांचा समावेश राहणार आहे.  15 ते 20 मिनिटांचा कालावधी असलेल्या  लेझर शो ची पटकथा मराठी, हिंदी, इंग्रजी  व तेलगू भाषेत प्रसारित  करण्यात येणार असून याकामी हाँगकाँग येथील मे.लेझर व्हिजन लिमिटेड या कंपनीस तसा कार्यादेशही देण्यात आला असल्याचे श्री. ससाणे यांनी सांगितले.
सुरक्षा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन 
          श्रीसाईबाबा मंदिर व परिसरातील सुरक्षेच्या दृष्टिने सुमारे 4 कोटी रुपये खर्चाचे साई मंदिर व परिसर सुरक्षा केंद्र उभारण्यात आले आहे. या सुरक्षा केंद्राचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सुरक्षा केंद्रात सर्व अत्याधुनिक सुविधांच्या कॅमेऱ्यांचा वापर केलेला आहे. यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य गुन्हेगारीला आळा घालणे सोयीचे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा केंद्राची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांनी श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले
          राहाता येथील विविध विकास कामांचे उद्‌घाटन समारंभ पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा