आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाऱ्यांनी
जनतेच्या भल्यासाठी करावा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 ऑक्टोबर : आजच्या काळात प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे एक उत्तम साधन उपलब्ध आहे. त्याचा उपयोग त्यांनी जनतेच्या भल्यासाठी आणि विकास कामांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 2010 च्या तुकडीतील 7 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज श्री.चव्हाण यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्री.के.पी.बक्षी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री.अजित कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.नितीन करीर उपस्थित होते.
श्रीमती प्रेरणा हिम्मतराव देशभ्रतार, श्रीमती सुमन रावत, सर्वश्री.शिलेश नवल, राहूल द्विवेदी, अशुतोष सलील, अनिल भंडारी व उदय चौधरी हे परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र केडरच्या सेवेत दाखल झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले पूर्वीच्या तुलनेत आज प्रशासन अतिशय सुलभ झाले आहे. याचे कारण शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात केला जाणारा वापर आणि संगणकीकरण हे आहे. आजच्या काळात प्रशासकीय सेवेत येणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना हा एक जादाचा फायदा आहे. सध्या महाराष्ट्रात 7/12 ऑनलाईन झाला असून तलाठ्याकडेही लॅपटॉप उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाने दिलेल्या या अमाप शक्तीचा फायदा तुम्ही जनतेच्या भल्यासाठी करावा. तंत्रज्ञानाचा गुलाम न होता त्याचा फायदा जनतेला कसा होईल, ग्रामीण भागातील विविध समस्यांवर कोणते उपाय योजता येतील यावर लक्ष केंद्रीत करावे. वेगवेगळ्या प्रादेशिक व नैसर्गिक विभागामुळे राज्यात विकासाचा मोठा असमतोल आहे. काही जिल्ह्यात मानवी विकास निर्देशांक अतिशय चिंताजनक आहे. अनुशेषाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. या पुढे विकासाची आखणी करताना जिल्हा हा घटक न ठेवता तालुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व नियोजन होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन काम करावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी नव्या अधिकाऱ्यांना दिला.
----0----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा