मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्पाला तत्वत: मंजुरी


कोकणाच्या कायापालटाची क्षमता असलेल्या
सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्पाला तत्वत: मंजुरी
          मुंबई, दि. 18 : संपुर्ण कोकणाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या आणि जागतिक पर्यटन नकाशावरील महाराष्ट्राचे स्थान बळकट करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित सी वर्ल्ड (थीम पार्क) प्रकल्पाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज तत्वत: मान्यता दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे पाचशेदहा कोटी रुपये असुन तो खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी व्यवहार्यता तफावत निधी (Viability Gap Funding) म्हणून 100 कोटी रुपये राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.
          उद्योगमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे, आमदार राजन तेली, पर्यटन सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
           पुणे विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क या विभागाने या प्रकल्पाचा आराखडा आणि शक्याशक्यता अहवाल तयार केला आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा अत्यंत समृद्ध आणि नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.  या किनारपट्टीमध्ये पर्यटनवृद्धीची अफाट क्षमता आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील देशी आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टीवर कोणत्या ठिकाणी असा प्रकल्प राबविणे शक्य आहे, यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य ठिकाणांची चाचपणी करण्यात आली.
          यानंतर अशा प्रकारच्या थीम पार्कसाठी आवश्यक असलेले वातावरण, नैसर्गिक परिस्थिती, सद्या येत असलेल्या पर्यटकांची संख्या, वाहतुकीच्या सोयी, आवश्यक जमिनीची उपलब्धता आदी गोष्टी विचारात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली. हा प्रकल्प नेमका कोणत्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाची अंतिम निवड नंतर केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा यापुर्वीच राज्यातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. समुद्राच्या पाण्याचा उबदारपणा, जैववैविध्य, कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, किनारी महामार्ग, कोल्हापूर बेळगावला जोडणारे घाटरस्ते, चिपी येथील नियोजित विमानतळ आदी अनुकुल बाबी या प्रकल्पाच्या निवडीसाठी लक्षात घेण्यात आल्या आहेत.
          या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक मत्स्यालय, परिषद केंद्र, पर्यटक निवास, डॉल्फिन स्टेडियम, थिएटर, जलक्रीडाकेंद्र, थीम रेस्टॉरंट, माहिती केंद्र, पाण्याखालील चित्रीकरण स्टुडिओ वगैरेंचा समावेश असणर आहे. हा प्रकल्प प्रत्यक्ष समुद्रात उभारता किनाऱ्याजवळ पडिक जमीन संपादीत करुन उभारला जाणार आहे. पर्यावरणविषयक जागृती, निसर्गाविषयी अधिक आकलन, मनोरंजन असे अनेक उद्देश या प्रकल्पामागे आहेत. भारतातील हा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात प्रचंड वाढ होणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आणि रोजगारनिमिर्ती करणारा आहे.
00000000
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा