मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उद्‌घाटन सोहळा



लोकप्रतिनिधींनी लोकशाही परंपरेचे
जतन आणि विधिमंडळ कामकाजाचे श्रेष्ठत्व जपावे
                                                       - राष्ट्रपती

          मुंबई, दि. 18 : विधानमंडळं लोकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. लोकप्रतिनिधींनी लोकशाही परंपरेचे जतन आणि विधिमंडळ कामकाजाचे श्रेष्ठत्व जपावे. महाराष्ट्राचं विधानमंडळ निकोप लोकशाही दृढमुल करण्यासाठी नेहमीच कार्यरत राहीले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज येथे केले.
          महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उद्‌घाटन सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती बोलत होत्या. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायणन हे होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, केंद्रीय कृषी व खाद्य प्रक्रिया मंत्री शरद पवार, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, ओरिसाचे राज्यपाल मुरलीधर भंडारे, त्रिपुराचे राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील, झारखंडचे राज्यपाल डॉ. सय्यद अहमद, केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलींद देवरा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील सदस्य, विधानपरिषद व विधानसभेचे माजी अध्यक्ष, सभापती ज्येष्ठ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास सुरुवात झाली. विधान परिषद सभापती श्री. देशमुख व विधानसभा अध्यक्ष श्री.वळसे-पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपतींना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
          राष्ट्रपती म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये विधानमंडळांना मोठे महत्व आहे. जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब या विधानमंडळांमध्ये उमटत असते. लोकप्रतिनिधींना विधीमंडळाच्या कामकाजाचे श्रेष्ठत्व जपून संसदीय लोकशाही परंपरेचे जतन करावे. लोकशाही हे उत्तम शासन व्यवस्थेचे चांगले साधन आहे. लोकशाहीची ताकद कायम ठेवण्यासाठी आपणा सर्वांचा प्रयत्न असला पाहीजे. लोकशाही अबाधीत राखुन तिला लागणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप टाळून दुसऱ्याची बाजू समजून घेतली पाहीजे. दुसऱ्याचे म्हणणे समजून घेणे हा समृद्ध्‍ लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही ज्यांना मान्य असेल त्यांनी दुसऱ्याची बाजू ऐकून घेतली पाहीजे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केले.
          सहीष्णूता, विश्वास, वाटाघाटी ही लोकशाहीची गरज आहे आणि त्याचं प्रत्येक नागरिकाने अवलंब केला पाहीजे. लोकशाहीचे भविष्य आणि विश्वास हे आपल्या प्रत्येकाच्या कृतीवर अवलंबून आहे. परिणामकारक लोकशाहीसाठी हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
          महाराष्ट्राचं विधानमंडळ निकोप लोकशाही दृढमूल करण्याकरिता नेहमीच कार्यरत राहीले आहे, याचा मला या सदनाची एक माजी सदस्या म्हणून सार्थ अभिमान आहे. लोकाभिमुख कायदे, विकास प्रक्रिया अधिक गतिमान करण्याकरिता हे व्यासपीठ दृढ राहील असा मला विश्वास वाटतो.
          महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशाला मार्गदर्शन करणारे अनेक कायदे दिले आहे. अनेक लोकोपयोगी कायदे करुन महाराष्ट्र विधिमंडळाने जनतेचं सार्वजनिक जीवन सुलभ केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करणे आणि देशात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणे ही अभिमानास्पद बाब आहे. निवडणूक प्रक्रिया, शिक्षण क्षेत्रात सुधारणा, महिलांचे सक्षमीकरण यासाठी समाजातील सर्वच घटकांनी, तज्ज्ञांनी विचारमंथन करण्याची गरज आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
          दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या भावंडांना ओवाळायला आले आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील भावंडांना उदंड आयुष्य लाभू दे, कर्तृत्व उजळू दे आणि जगामध्ये भारताच्या बलशाली लोकशाहीचा झेंडा डौलाने फडकत राहू दे असे भावनिक आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
          राज्यपाल के.शंकरनारायणन म्हणाले की, या देशात संसद सार्वभौम असून लोकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावेत यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ससंदीय कार्यपध्दतीची मूल्ये राखली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, कसेल त्याची जमीन हा क्रांतिकारक कायदा या विधानमंडळाने केला. 1971 साली दुष्काळ पडल्यानंतर मागेल त्याला काम मिळाले पाहिजे यासाठी राज्यात रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला आणि आज देशपातळीवर तो स्वीकारण्यात आला आहे. अनेक दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन या विधिमंडळास लाभले आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वता यांची शिकवण या दिग्गजांनी  दिली. त्यांच्या शिकवणीनुसारच राज्याच्या विधिमंडळाची वाटचाल सुरु आहे.
          संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण आणि ज्या दिग्गजांनी या सभागृहास सर्वोच्च पातळीवर नेले त्यांचा नामोल्लेख करुन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. विविध क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. राज्याच्या विधिमंडळाने तयार केलेली रोजगार हमी योजना केंद्राने देशभर लागू केली. अशा अनेक प्रकारचे कायदे महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त संकल्प करण्यात आले असून त्यात नागपूर येथील विधानभवनात राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींना प्रशिक्षण देणार आहोत. महाविद्यालयीन स्तरावरही प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या धर्तीवर विधिमंडळाची दूरचित्रवाहिनी सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या 75 वर्षात विधानमंडळाने केलेल्या विविध कायद्यांचा आढावाही श्री. वळसे-पाटील यांनी यावेळी घेतला.
          मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, पथदर्शी कायद्यांचा पायंडा महाराष्ट्रातील विधिमंडळाने घातला असून देशाला कर्तृत्ववान नेतृत्वही दिले आहे. ध्येयवादी, सेवाभावी, कार्यक्षम प्रतिनिधी या विधानमंडळाला लाभले. विधानमंडळाचा इतिहास उज्ज्वल असून विद्यमान सदस्यांची जबाबदारी वाढली आहे. सामाजिक परिवर्तनाची महाराष्ट्राला परंपरा लाभली आहे आणि या पवित्र सभागृहात जनतेच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होत आहेत. साडेअकरा कोटी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास विधिमंडळ कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
          सरकारवर अंकुश ठेवणारे हे विधिमंडळ असून या विधिमंडळाने देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. लोकशाही प्रणालीत तळागाळातील जनतेला विधानमंडळाने न्याय दिला आहे, या शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी विधानमंडळाचा गौरव केला.
          केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा "विक्रमादित्या" या शब्दात गौरव केला. श्री. पवार म्हणाले की, 1962 साली वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी आमदार म्हणून प्रतिभा पाटील यांनी आपली कारकीर्द सुरु केली आणि त्यांचा प्रवास राज्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेत्या, संसद सभासद, राज्यपाल आणि आता राष्ट्रपती असा आहे त्याबद्दल या राज्यास त्यांचा सार्थ अभिमान आहे. समर्थ संसदपटू म्हणून प्रतिभाताईंकडे आदराने पाहिले जाते. सदनाचे महत्व कायम ठेवायचे असेल तर संसदीय मर्यादा आणि विधिमंडळाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
          जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम या विधानमंडळाने केले आहे असे सांगून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख म्हणाले की, या विधानमंडळाच्या सदस्य असलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या कारकीर्दीतच विधानमंडळाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे हा अमृतयोगच म्हटला पाहिजे.
          विधानमंडळ सदस्यत्वाचा लोककल्याणासाठी उपयोग होऊन व्यापक लोकहिताचे निर्णय भविष्य काळात घेतले जातील आणि राज्याचे हित जपले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. 
          यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
          राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा यावेळी महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते यावेळी 75 निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या "नोंदी" तसेच "स्मृतीगंध" या ग्रंथांचे प्रकाशन आणि टपाल विभागाने केलेल्या विशेष पाकिटाचे अनावरण यावेळी करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते विधानमंडळाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करुन देणाऱ्या प्रदर्शनाचे स्वयंचलीत यंत्राची कळ दाबून उद्‌घाटन केले.
          विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख आणि बी.टी.देशमुख यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मॉरिशस येथील मराठी मंडळ फेडरेशनतर्फे गणेश आवाहन तर सचिवालय जिमखाना संगीत आणि नृत्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र गौरव गीत सादर करण्यात आले.
          ससंदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, विविध देशांचे राजदूत, लोकप्रतिनिधी, गटनेते, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, विविध राज्यातून आलेले पिठासीन अधिकारी, साहित्य, कला, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. या सोहळ्याचा समारोप राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाने करण्यात आला.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा