मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

राज्य सहकारी बँकेचा शताब्दी सांगता समारंभ



सहकारी चळवळीच्या पुढील वाटचालीसाठी
  धोरणात्मक निर्णय आवश्यक - मुख्यमंत्री
            मुंबई, दि.11: पाश्चिमात्य देशातील बँका आर्थिक अडचणीत आल्या असून पुन्हा एकदा वैश्विक मंदीची लाट आली आहे.  या जागतिक मंदीचे परिणाम आपल्या देशातील अर्थव्यवस्थेवरही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य शासनाला काही निश्चित स्वरुपाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे परखड मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले. 
राज्य सहकारी बँकेचा शताब्दी सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
राज्य सहकारी बँकेचा शताब्दी समारोप सोहळा साजरा करीत असताना हा क्षण अतिशय अभिमानाचा असला तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषांचे पालन करुन राज्य सहकारी बँकेची वाटचाल चालू रहाणे आवश्यक आहे. राज्य सहकारी बँकेच्या पुढील वाटचालीस राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 1991 साली तत्कालीन अर्थमंत्री व विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शासनाने बँकांना वित्तीय पुरवठा करुन सुदृढ केल्यामुळे 2008 च्या आर्थिक मंदीतही भारतात बँकांचे अस्तित्व टिकून राहिले.
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्य सहकारी बॅंकेला आगामी काळात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. या बॅंकेस ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय वित्त मंत्र्यांशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केली.  31 मार्च 2012 पूर्वी राज्य सहकारी बँकेस अनुज्ञप्ती मिळणे हे फार मोठे आव्हान आहे. वेळ पडल्यास ही मुदत वाढवून घ्यावी लागेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य सहकारी बँकेकडे 15 हजार कोटींच्या ठेवी आहेत. पीक कर्जासाठी 2400 कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकेने उपलब्ध केली आहे.  पीक कर्जासाठीची रक्कम दरवर्षी वाढत जाणार असून 2014 साली 25 हजार कोटींचा निधी पीक कर्जांसाठी उपलब्ध करुन द्यावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.
11 ऑक्टोबर 1911 या दिवशी मुंबई अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीची स्थापना सर विठ्ठलदास ठाकरसी, लल्लूभाई सामळदास आणि वैकुंठभाई मेहता या दिग्गजांमुळे झाली. पुढे या सोसायटीचे नामांतर होत होत ती महाराष्ट्र स्टेट को.ऑप.बँक झाली.  देशातील पहिल्या सहकारी साखर कारखानदारीचा उदय महाराष्ट्रात होऊन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराला नवा आयाम दिला.  राज्यातील 106 कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने अर्थसहाय्य केले असून 89 कारखाने उत्पादनात आहेत. 27 हजार कोटींचे खेळते भांडवल असणाऱ्या या बँकेने सहकारातून ग्रामीण भागाचा आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक विकास करुन कायापालट केला आहे.
बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी बँकेने 100 वर्षात केलेल्या दैदिप्यमान प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पदुम मंत्री मधुकर चव्हाण, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, डेप्युटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डेप्युटी गवहर्नर डॉ. सुबीर गोकर्ण, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, सहकार सचिव राजगोपाल देवरा, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, बँकेच्या कारर्कीदीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेले खासदार आनंदराव अडसूळ, श्रीमती मिनाक्षीताई पाटील, श्रीमती रजनी पाटील, जयंत पाटील,अंकुश टोपे आदि मान्यवर उपस्थित होते.  सुधीर गाडगीळ यांनी  सूत्रसंचालन केले.
000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा