शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

धम्म प्रवर्तन दिन सोहळा थाटात साजरा


दीक्षाभूमीच्या  विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही
                                                   .. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
धम्म प्रवर्तन दिन सोहळा थाटात साजरा
            नागपूर,दिनांक 6 : लाखो बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.  असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  दिले. ते 55 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केरळचे माजी राज्यपाल रा. सू. गवई होते तर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  शिवाजीराव मोघे, महापौर अर्चना डेहनकर, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार एस. क्यू. जमा, आमदार नाना शामकुळे, भंते सुरई ससाई, कार्यवाह सदानंद फुलझेले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना  प्रदान केली. घटनेच्या चौकटीत राहून शोषित, पिडीत समाजाचा विकास साधल्या जाऊ शकतो. त्यांचे हे कार्य पुरोगामी विचाराची परंपरा असलेल्या महाराष्ट्र शासनाने अंगिकारले आहे. आपल्या देशात   समाजाला आत्मसन्मानाने  जगण्याची संधी देणाऱ्या डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक व आर्थिक सबलीकरणाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी 4 हजार 100 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. आदिवासींच्या विकासासाठी ही तरतूद 3 हजार 800 कोटी रुपयांची आहे. दारिद्र्यरेषेखालील 9 लाख 50 हजार कुटूंबांना हक्काचे घरकुल देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनांच्या माध्यमातून शोषित, पिडीत समाजाचा विकास साधल्या जाईल, असा आशावाद त्यांनी  व्यक्त केला.  
दीक्षाभूमीच्या विकासासाठी वेळोवेळी शासनाने निधी दिला आहे. यापुढे विकासाच्या सगळ्या योजनांसाठी शासन प्राधान्याने निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासोबतच मुंबई येथील चैत्यभूमीच्या विकासासंबंधी आपण स्वत: पंतप्रधानांना निवेदन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात रा.सू गवई म्हणाले की, दीक्षाभूमी ही प्रेरणा देणारी भूमी असून या प्रेरणादायी भूमीचा विकास करण्याचे काम राज्य तसेच केंद्र शासनाने प्राधान्याने करावे. लोकशाही ही सामाजिक व आर्थिक लोकशाही व्हावी, अशी आशा व्यक्त करुन घटनेची चौकट शाबूत ठेवण्याचे कार्य समाजाला करावे लागणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक म्हणाले की, बाबासाहेबांनी तळागाळातील समाजाला न्याय हक्क मिळवून दिला. डॉ.बाबासाहेबांच्या घटनेमुळे देशाची लोकशाही एकसंघ असल्याचे सांगून जागृत नागरिकांना घटनेचे संरक्षण करावे लागेल. असे वासनिक म्हणाले.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांविषयी त्यांनी यावेळी  माहिती दिली.घटना निर्मितीच्या वेळी सरकारने डॉ. बाबासाहेबांवर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करुन दाखविल्यामुळे आज देशाला परिपूर्ण व सर्वसमावेशक घटना मिळाली असल्याचे सांगून घटनेच्या चौकटीत राहूनच समाजाचा विकास साधला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
दीक्षाभूमी जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले असल्याचे सांगून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचण्यासाठी दीक्षाभूमीवर लाईट ॲण्ड साऊंड शोची निर्मिती करण्यात यावी. आजच्या दिवशी आपण सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे पाईक होण्याचा निश्चय करू या असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. याप्रसंगी नागपूरच्या महापौर अर्चना डेहनकर यांनी नागपुरात नामांतर शहीद स्मारक उभारणार असल्याचे सांगितले.
आपल्या प्रास्ताविकात कार्यवाह सदानंद फुलझेले यांनी समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काय्रक्रमाचे संचलन डॉ. सुनील रामटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार सदानंद फुलझेले यांनी मानले.

यावेळी प्रभारी आयुक्त व नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सचिव ई.झेड. खोब्रागडे, पोलीस आयुक्त अंकुश धनविजय, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                       ***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा