बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्र विधीमंडळाची गौरवशाली परंपरा उंचावत ठेवूया :मुख्यमंत्री

          मुंबई, दि.19: विधीमंडळ सदस्यांनी अभ्यासपूर्वक आणि लोकहिताचे प्रश्न विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून देऊन महाराष्ट्र विधीमंडळाची गौरवशाली परंपरा उंचावण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधीमंडळ सदस्यांकरिता दोन दिवसांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्य मंत्री  प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, ग्रामविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदींसह विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, समाजात वावरताना सभागृहाचा विचार आणि  सभागृहात वावरताना समाजाचा विचार करुन सभागृहामध्ये बोलत असताना कमी वेळेत आपले महत्वाचे मुद्दे मांडता आले पाहिजे. प्रत्येक प्रशिक्षण वर्ग वेळोवेळी काहीतरी नवीन शिकवित असतो त्यामुळे  सदस्यांनी प्रशिक्षणात सहभागी होणे गरजेचे असते. आपण ऐकतो ते विसरतो. आपण पाहतो ते लक्षात ठेवतो. जे कार्य आपण करतो ते आपल्याला समजते त्यासाठी विधीमंडळ कामकाजामध्ये सहभागी होऊन ते आपण कृतीत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सदस्यांनी सभागृहामध्ये जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून कामकाज समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे.
सदस्यांनी संधी शोधून त्याचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कामकाजाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले पाहिजे,प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विधीमंडळाची गौरवशाली परंपरा आहे. आपण सर्वांनी मिळून त्याची उंची अशीच वाढवू या आणि विधी मंडळाचे कामकाज सर्वांनी एकत्रितपणे करुन असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधानमंडळात लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न मांडतात आणि ते सोडविण्यासाठी काम करीत असतात. सदस्यांनी विधीमंडळात काम करीत असताना अभ्यास करुन काम करा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, 13 व्या विधानसभेत 130 नवीन सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत, त्यांच्या बरोबरच इतर सदस्यांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे असते या सर्व सदस्यांचा विचार करुनच प्रशिक्षण केंद्राने गेल्या चार वर्षापासून वि.स.पांगे, संसदीयकेंद्रातर्फे  प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. या प्रशिक्षणामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक विधानमंडळ सदस्यांनी उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण म्हणून कार्य केले आहे. महाराष्ट्र विधानमंडळ हे देशात आदर्श विधानमंडळ म्हणून गौरविले गेले आहे. हा गौरव आपण यापुढेही असाच चालू ठेवू विधीमंडळात अनेक आयुधे सदस्यांच्या हातात असतात त्याचा त्यांनी योग्य वापर केल्यास जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होते. त्यासाठी सदस्यांनी या आयुधांचा योग्य तो वापर करावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
          आज विधानमंडळात अनेक नवीन सदस्य निवडून आलेले असले तरी त्यांना स्थानिक संस्था, सहकारी संस्था यांच्या कामाचा अनुभव निश्चितच असेल त्यामुळे त्यांना संसदीय कामात त्याचा उपयोग होईल, असे सांगून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, सभागृहात टाचणी पडली तरी ती घटना लोकांपर्यंत लगेच पोहोचते त्यामुळे सदस्यांनी सभागृहामध्ये शांततेने आपले प्रश्न मांडून सोडवून घ्यावेत आणि सभागृहाची उंची वाढवावी. संसदीय आयुधांचा वापर करुन सदस्यांनी गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचा, मतदारांचा, मतदार संघातील जनतेचा विकास डोळयासमोर ठेवून कार्य करावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
संसदीय कार्यमंत्री श्री. महेता म्हणाले की,  संसदीय विधीमंडळाच्या माध्यमातून आपण आपल्या गावचे, जिल्हयाचे, राज्याचेही प्रश्न मांडू शकतो त्यासाठी विधी मंडळ कामकाजामध्ये प्रश्नोत्तरे, तारांकीत प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव, विशेष चर्चा व शासकीय विधेयक अशा माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न विधानमंडळात मांडून ते त्यांना न्याय देऊ शकतो, असे सांगून सभासदांनी पूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहिल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते. आज आयोजित केल्या प्रशिक्षण वर्गाचा सर्व लोकप्रतिनिधींनी आवश्यक लाभ घ्यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी आभार मानले.
००००

सीआयआयच्या शिष्टमंडळाला आश्वासन
उद्योगांच्या समस्यांविषयी दर महिन्यात बैठक
घेऊन तात्काळ मार्ग काढणार : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19 : दर महिन्यात एकदा उद्योजकांच्या संघटनांसमवेत बैठक आयोजित करून त्यांना येणाऱ्या समस्यांवर त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्ग काढला जाईल.  यामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय) ने पुढाकार घेतल्यास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
आज मंत्रालयात सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उद्योग विश्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या तसेच उद्योगांच्याबाबतीत सरकारने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांचे स्वागत केले.  यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगांना मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि पारदर्शक व्हावी यावर आम्ही विशेष भर देत असून यासाठी एक ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे.  या यंत्रणेमुळे संबंधित फाईल्सचा प्रवास कालबध्द रितीने होत आहे की नाही हे देखील पहाता येईल. सध्या 76 प्रकारचे परवाने उद्योग सुरु करण्यासाठी लागतात ते 25 वर कसे आणता येईल याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना ‘मेक इन महाराष्ट्र’ ची संकल्पना सांगितली.  उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एक महिन्याच्या आत देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट नेमण्यात येत असून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मैत्री च्या माध्यमातून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या विभागांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही असे ते म्हणाले.
          या शिष्टमंडळात अदी गोदरेज, सुधीर मेहता, सुनील अडवाणी, दीपक प्रेमनारायण, मधुर बजाज, निनाद कर्पे इतर उद्योजक उपस्थित होते.

-----०-----
राज्यातील अभूतपूर्व दुष्काळाचा मुकाबला
करण्यासाठी ठोस पाऊले उचलली
--------------
मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाला माहिती

      मुंबई, दि. 19 : राज्यातील 50 टक्के गावांना दुष्काळाचा फटका बसला असून ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे.  मात्र, आम्ही तातडीने पाऊले उचलल्यामुळे दुष्काळग्रस्तांना वेळीच पुरेशी मदत मिळेल याची खात्री बाळगा असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. 
        विरोधी पक्षनेते आमदार एकनाथ शिंदे, आमदार सर्वश्री. रामदास कदम, दिवाकर रावते, निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात निवेदन दिले. 
        यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने सूट दिली असल्याने आता वैयक्तिक पंचनामे करण्याची गरज नाही.  त्यामुळे पंचनाम्यांमध्ये जाणारा वेळ वाचला आहे.  महसूल मंत्री दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून लवकरच ते त्यांचा अहवाल देतील त्यानुसार केंद्राला निवेदन सादर करण्यात येईल.
        केंद्राने कापूस पणन महासंघाला सब एजंट नेमण्याची परवानगी दिली असून त्यामुळे आता खरेदी केंद्रे लवकरच सुरु होतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादकांवर अन्याय होऊ देणार नाही.
विजेच्या टंचाई संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कोळशाचा पुरवठा सुरु झाल्याने 1700 मेगावॅट तूट भरून निघाली असून कालपासून ज्या ठिकाणी लोडशेंडीग करावे लागत होते ते आता दोन तासांनी कमी झाले आहे. ट्रान्सफॉर्मर्स मागणीनुसार लगेच उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता आपले सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
-----0-----

000000000000000000
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
           मुंबई, दि. 19 :  भारताच्या  माजी पंतप्रधान  इंदिरा गाधी यांच्या जयंतीनिमित्त  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात  त्यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
          इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून  साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय एकात्मता दिन कौमी सप्ताहानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिलीयाप्रसंगी उद्योगमंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस.मीना, नगरविकास विभागाचे  प्रधान  सचिव मनुकुमार श्रीवास्तव, शालेय शिक्षण  विभागाच्या सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.पी. मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा