मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

नवे वर्ष शांती, प्रगती आणि संपन्नतेचे येवो -मुख्यमंत्री

मुंबई, दि. ३१ : नवे २०१४ हे वर्ष शांती, प्रगती सामाजिक सुरक्षा आणि संपन्नता घेऊन येवो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.
        नववर्षानिमित्त श्री. चव्हाण यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, येणारे प्रत्येक नवीन वर्ष हे नवी आशा घेऊन येते. प्रत्येकजण आपल्या परीने नवनवे संकल्प करतो. या नव्या वर्षात सर्वांचे संकल्प सिद्धीस जावोत आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत. २०१४ हे वर्ष निवडणुकांचे असल्यामुळे राजकीयदृष्ट्या खुप धावपळीचे आणि महत्वाचे असणार आहे. सरत्या वर्षात लोककल्याणाचे अनेक निर्णय घेऊन ते राबविण्याचा यशस्वी प्रयत्न आपण केला. येत्या वर्षातही सर्वसामान्य माणूस हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असेल. सार्वजनिक हिताच्या निर्णयांना प्राधान्य देऊन सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य कसे करता येईल, यावरच आपण भर देणार आहोत. कोरडवाहू शेती शाश्वत करणे, समतोल औद्योगिक विकास साधणे, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ कायमचा संपविणे, शिक्षणाच्या दर्जात वाढ करणे आणि सुनियोजित नागरीकरण करणे, ही विकासाची पंचसूत्री मी जाहीर केली आहे आणि त्यादृष्टीने बरीच पावलेही उचलली आहेत. येत्या वर्षभरात ही पंचसूत्री प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, याच ख्रऱ्या शुभेच्छा ठरतील, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

                                                           ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा