गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

जादूटोणा विरोधी कायदा हा पुरोगामी विचारांचा विजय –मुख्यमंत्री
विधीमंडळाने मंजूर केलेला जादूटोणा विरोधी कायदा हा राज्यातील पुरोगामी विचारांचा आणि विवेकशक्तीचा विजय आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

        हा कायदा मंजूर करण्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल श्री. चव्हाण यांनी विरोधकांचे व संपूर्ण सभागृहाचे आभार मानले आहेत. तसेच, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व या कायद्यासाठी प्रदीर्घ काळ लढा देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. श्री. चव्हाण म्हणाले की, हा कायदा व्हावा, यासाठी अत्यंत संयमी आणि विवेकावर आधारित लढा देणारे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्मरण आज प्रकर्षाने होते आहे. महाराष्ट्रासारख्या प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या प्रगतशील राज्यात या कायद्याला झालेला विरोध क्लेशकारक आहे. या कायद्यामुळे जादुटोणा, नरबळी, अनिष्ट प्रथा कमी होण्यास नक्कीच मदत होईल. पण या कुप्रथा नष्ट होण्यासाठी कायद्याबरोबरच सामाजिक प्रबोधनाचीही तेवढीच गरज आहे. राज्यातील सुजाण जनता विचारआणि विवेक यांचे पालन करील आणि या कुप्रथांना हद्दपार करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा